बदलापूरमध्ये प्रत्येक मालमत्ताधारकाकडून आकारणी; प्रस्तावाला नगरसेवकांचा विरोध

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासनाने मलनिस्सारण योजनेच्या जोडणीसाठी मालमत्ताधारकांकडून पाच हजार रुपये व सुरक्षा अनामत म्हणून एक हजार रुपये इतके शुल्क आकारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. शहरात भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून यातील अंतर्गत गटारांच्या वाहिन्या या मालमत्तांना जोडायच्या असल्याने त्यासाठी मलनिस्सारण जोडणी शुल्क नागरिकांकडून आकारण्यात येणार आहे. मात्र इतकी मोठी रक्कम आकारण्यास सगळ्याच नगरसेवकांनी एकमुखी विरोध केला आहे.

नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मलनिस्सारण योजनेच्या वाहिन्यांना जोडणी देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला. पालिका हद्दीत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियान अंतर्गत भुयारी गटार योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २२ दशलक्ष लिटर्स क्षमतेचे एक प्रक्रिया केंद्र, पाच पंपिंग स्टेशन व ८२ किमी लांबीचे वाहिन्यांचे जाळे प्रस्तावित आहे. त्यापैकी प्रक्रिया केंद्र व तीन पंपिंग स्टेशनचे बांधकाम व वाहिन्यांच्या जाळ्यांचे काम पूर्ण झाले असून, तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र या मुख्य मलनिस्सारण योजनेतील वाहिन्यांच्या जोडण्या नागरिकांना देण्यासाठी किती शुल्क आकारण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे नुकताच सादर केला.

सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव चर्चेत आला असता नगरसेवकांनी इतके शुल्क आकारण्यास विरोध दर्शवला आहे. या विशेष सभेत मलनिस्सारण वाहिनी जोडणी विनामूल्य करण्यात यावी, अशी भाजपकडून आग्रही भूमिका घेण्यात येणार असल्याचे भाजपच्या एका नगरसेवकाने सांगितले. त्यामुळे मलनिस्सारण योजनेच्या जोडणीसाठी बदलापूरकारांकडून किती शुल्क आकारणी होणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, यावर लवकरच विशेष सभेचे आयोजन करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी सभेदरम्यान स्पष्ट केले.

एमएमआरडीएच्या कर्जफेडीसाठी वसुली

पालिकेने या प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून १५० कोटींचे कर्ज घेतले असून त्यासाठी दर सहा महिन्यांनी ८ कोटी  ४१ लाख रूपये इतकी रक्कम भरावी लागत आहे. तसेच या योजनेच्या ५ वर्षांसाठी होणाऱ्या देखभाल-दुरुस्तीसाठी ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार प्रशासनाने मलनिस्सारण वाहिनी जोडणीसाठी ५ हजार रुपये प्रतीसीट व अनामत रक्कम म्हणून १ हजार रुपये इतके शुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे.

जोडणी खर्च नागरिकांचा..

इमारतीपासून योजनेच्या मुख्य मलनिस्सारण वाहिनीपर्यंत जोडणीचा खर्च नागरिकांना करावा लागणार आहे. या खर्चात जोडणी शुल्क, रस्ते खोदाई शुल्क तसेच सुरक्षा अनामत आदींचा समावेश आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now badlapur municipal will apply tax on every property holder