कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या प्रस्तावाच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून रुग्णालयात सुरू असलेल्या रामभरोसे कारभाराला कॅमेऱ्यांच्या योजनेमुळे लगाम बसणार असून रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी विशेष मदत होणार आहे.
ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात माफक दरात आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. यामुळे रुग्णालयात ठाणे, कळवा तसेच जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरू असून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात अनेकदा तक्रारी पुढे आल्या आहेत. रुग्णालयातील औषधाचे दुकान आणि डायलेसीस केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. खासगी संस्थेमार्फत डायलेसीस केंद्रात जास्त पैसे आकारण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवकांनी अनेकदा केला असून रुग्णालयाच्या रामभरोसे कारभारावरून अनेकदा महापालिकेची सर्वसाधारण तसेच स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आले आहे.