रखडलेला कचोरे -पत्रीपूल रेल्वे समांतर रस्ता पूर्ण होणार ; ठाकुर्लीतील समांतर रस्त्यामुळे ‘सिंगापूर’चा भास

कल्याण आणि डोंबिवली या शहरांतील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी करू शकणाऱ्या समांतर रस्त्याच्या उभारणीतील महत्त्वाचा अडथळा आता दूर झाला आहे. ठाकुर्लीतील कचोरे गाव ते पत्रीपूल या दरम्यानच्या रस्त्य़ाच्या उभारणीत येत असलेली रेल्वेच्या मालकीची जागा देण्यास रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला असल्याने गेल्या वर्षभरापासून रखडलेला हा ३०० मीटरचा रस्ता नवीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. याच रस्त्याला जोडून असलेल्या पत्रीपूल ते ठाकुर्ली आणि म्हसोबानगर ते एमआयडीसी डोंबिवली या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून त्यावरून वाहनांची वर्दळही सुरू झाली आहे. सिंगापूर शहरातील प्रशस्त रस्त्यांप्रमाणे दिसणारा हा रस्ता डोंबिवलीकरांना भविष्यातील चांगल्या वाहतुकीचे प्रत्यंतर देणारा आहे. त्याच धर्तीवर हा संपूर्ण रस्ता तयार करण्यात येत असल्याने येत्या काळात कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास सुखकर होण्यासोबतच शहरांतर्गत वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे.

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारे पत्रीपूल ते ठाकुर्ली आणि म्हसोबानगर ते एमआयडीसी (डोंबिवली) उच्चतम दर्जाचे रेल्वे मार्गाला समांतर असे दोन देखणे रस्ते कल्याण-डोंबिवली महापालिकेने एका वर्षांत पूर्ण केल्यामुळे शहरवासीयांचा प्रवास सुखकर झाला आहे. या दोन्ही रस्त्यांसाठी खास सिंगापूरहून आयात केलेले विशेष तंत्रज्ञान वापरात आणण्यात आले असून त्यामुळे कल्याण ते डोंबिवली हा प्रवास अवघ्या आठ ते दहा मिनिटांचा झाला आहे.  ठाकुर्ली, चोळे,  कांचनगाव परिसरात नवीन गृहसंकुले उभी राहत आहेत. हा भाग तिसरी डोंबिवली म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या भागातून महापालिकेचा विकास आराखडय़ातील रस्ता प्रस्तावित होता. नवीन गृहसंकुले हेही पालिकेच्या महसुलाचे साधन आहे. त्यामुळे महापालिकेने म्हसोबानगर भागातील विकास आराखडय़ातील रस्त्याचे काम गेल्या वर्षी हाती घेतले होते. अवघ्या वर्षांच्या अवधीत काम पूर्ण झाले आहे. दुभाजकांमध्ये फुलांची, शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत.

वाहनचालकांचा प्रवास सुखकर

डोंबिवलीतून घरडा सर्कलने बाहेर पडणारा वाहनचालक सावित्रीबाई फुले चौकापुढील रस्त्यावरून डावे वळण घेऊन म्हसोबानगरच्या चार पदरी रस्त्यावर येऊन तेथून तो पत्रीपुलाच्या दिशेने निघून जाईल. या पर्यायी रस्त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर पत्रीपूल ते टाटानाका, डीएनएस बँक वळण, मानपाडा चौक वळणावर(डोंबिवलीत येण्यासाठी) जो भार येत होता. तो कमी होण्यास साहाय्य होणार आहे. कल्याण शहरामधून बाहेर पडणारा वाहन चालक पत्रीपुलावरून शिळफाटा रस्त्याने न जाता डोंबिवलीत येण्यासाठी पत्रीपुलाजवळ उजवे वळण घेऊन मोहन सृष्टी संकुलाजवळून समांतर रस्त्याने ठाकुर्लीतील हनुमान मंदिराजवळून किंवा म्हसोबानगर रस्त्याने एमआयडीसीच्या दिशेने शहरात येऊ शकणार आहे. या समांतर रस्त्यामुळे कल्याण ते डोंबिवली हे अंतर वाहनाने फक्त आठ ते नऊ मिनिटाचे असणार आहे.  परिसरातील रहिवासी सकाळ, संध्याकाळी, रात्री या रस्त्यावर शतपावलीसाठी, नवीन चालक वाहनाचे धडे गिरविण्यासाठी येतात.

Story img Loader