कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने आधुनिकतेच्या दिशेने पाऊल टाकत गुजरातमधील एका सुसज्ज स्मशानभूमीच्या धर्तीवर येथील मांजर्ली स्मशानभूमीत होणारे अंत्यविधी इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून ही सुविधा बंद आहे. आता ही सुविधा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. ही यंत्रणा सुरु झाल्यास मृताच्या नातेवाईकास ऑनलाइन अंत्यदर्शन घेता येणार आहे.
सध्याच्या आधुनिक युगात अनेक नागरिक नोकरीनिमित्त परदेशात वास्तव्याला असतात. या परदेशात असलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यास त्यांना तातडीने मायदेशी येणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे इच्छा असूनही मृत व्यक्तीच्या अंत्यविधीला उपस्थित राहता येत नाही, त्याच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येत नाही. याची हुरुहूर कायम त्यांच्या मनात राहते. या पाश्र्वभूमीवर कुळगाव-बदलापूर नगर परिषद प्रशासनाने अंत्यविधी ऑनलाईन पाहण्याची  सुविधा उपलब्ध करून दिली होती. मांजर्ली येथील स्मशानभूमीत दोन अत्याधुनिक सीसी टी.व्ही. कॅमेरे बसविले. ते चित्रीकरण संगणकीय प्रणालीला जोडून  संकेतस्थळावर येथे सुरु असलेला अंत्यविधी ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. २०११ मध्ये ही सुविधा सुरू करण्यात झाली. मात्र सुरुवातीला सुरळीत सुरू असलेल्या या प्रणालीत नंतर अडचणी येऊ  लागल्या. गेल्या तीन वर्षांपासून ती पूर्णपणे ठप्प झाली आहे. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच ही सुविधा पूर्ववत सुरू होणार असल्याचे सांगितले. अंत्यसंस्कारादरम्यान आगीची धग बसल्याने, तसेच काळ्या धुरामुळे कॅमेरे निकामी झाल्याने ही समस्या निर्माण झाली. परंतु आता ही समस्या लक्षात घेऊन अधिक चांगल्या प्रकारे ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.