घडय़ाळाच्या काटय़ांप्रमाणे शहरी माणसाचे जीवनदेखील आता गतिमान झाले आहे. या गतिमान जीवनात त्याचे अनेकदा स्वत:च्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. काही वेळापुरती पोटाची भूक शमेल, अशा पदार्थाचा शोध सुरू होतो. वेळेची बचत होऊन त्वरित तयार होणाऱ्या पदार्थाना प्राधान्य दिले जाते. लहान मुलांपासून ते मोठय़ा व्यक्तीपर्यंत अनेक जण या लवकर तयार होणाऱ्या फास्ट फूडचा आधार घेतात. आज बाजारात अनेक नवे फास्ट फूडचे प्रकार येऊ  लागले आहेत. एक असाच फास्ट फूडमधला प्रकार सध्या ठाण्यातील यशोधननगर भागातील प्रसिद्ध प्रकार आहे. कधी तरी आपले डायट बाजूला ठेवून फास्ट फूडवर ताव मारायचा असेल तर इथे मिळणारे ‘देसी नगेट्स’ खाण्याचा आनंद देणारे आहेत.

पाश्चिमात्य देशातील लोकप्रिय पदार्थ असलेला हा पदार्थ सर्वाच्याच आवडीचा झाला आहे. ठाण्यातील यशोधननगर भागातील ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’ या दुकानातील देशी नगेट्स हा पदार्थ खूपच प्रसिद्ध आहे. भारती विद्यापीठात हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेले ओंकार साठे आणि अभिजित परब या दोघा मित्रांनी घेतलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्षात व्यवसायात उपयोग करायचे ठरवले आणि खवय्यांना रुचेल अशा फूड कॉर्नरची संकल्पना समोर आली. खवय्यांना खाद्यपदार्थामध्ये काही तरी वेगळी चव देण्याच्या दृष्टिकोनातून या दोघांनी आपल्या फूड कॉर्नरमुळे अनेकांना आकर्षित केले आहे. दोन मित्रांनी एकत्र येऊन ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’ अशा नावाने सुरू केलेले लहानसे ‘फूड कॉर्नर’ तरुणांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. इतरांपेक्षा काही तरी वेगळे फास्ट फूड देऊ म्हणून त्यांनी ‘देसी नगेटस्’ हा पदार्थ बनवण्यास सुरुवात केली.

हॉटेल व्यवस्थापन शिकताना क्विक सव्‍‌र्हिस रेस्टॉरंट हा विषय असतो आणि त्यातूनच काही तरी करण्याचा प्रयत्न या दोन मुलांनी केला आणि ‘देशी नगेटस्’ अस्तित्वात आले. या पदार्थामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकार आहेत. नगेटस् हे तळून एका पॅनमध्ये विशिष्ट प्रकारे टॉस करून त्यावर चीजचा थर दिला जातो. येथील मांसाहारी नगेटस्मध्ये बारीक केलेले चिकन टाकले जाते. त्यानंतर त्याला चीजचे आवरण दिले जाते. त्यामुळे हे मांसाहारी नगेटस् चविष्ट लागतात. नगेटस्मध्ये पाणीपुरी, पावभाजी यांसारखे निरनिराळे फ्लेवर समाविष्ट केले जातात. या नगेटसोबत मेओनिज, तंदूर, चिपोतले, थाउजंड हायलॅण्ड, मस्टर्ड, टोमॅटो सॉस यासारख्या निरनिराळ्या प्रकारचे सॉसेस दिले जातात. त्यामुळे हे देसी नगेटस् या सॉसेससोबत खाण्यास खऱ्या अर्थाने मजा येते. या फूड कॉनर्रवर पावभाजीदेखील मिळते आणि खासियत म्हणजे ही पावभाजीची भाजी घट्ट स्वरूपात करून दाबेलीसारखी पावात घालून दिली जाते. त्यामुळे या पदार्थाची चव इतर दाबेलीपेक्षा अनोखी लागते. मिक्स अ‍ॅण्ड मॅच या फूड कॉनर्रमध्ये चीज फ्रेंच फ्राइज, मसाला फ्रेंच फ्राइज, चीज बर्गर, मेओनिज बर्गर, फ्रँकी, सँडविच यांसारखे निरनिराळे खाद्यपदार्थाचे पर्याय उपलब्ध होतात.

शालेय विद्यार्थ्यांना दहा टक्के सूट

या फूड कॉनर्रची एक खासियत म्हणजे येथे कोणत्याही शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पदार्थात दहा टक्के सूट देण्यात येते. तसेच हे फूड कॉर्नर हँगआऊट फूड कॉर्नर ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी येऊन विद्यार्थी अभ्यास करू शकतात. मित्रमैत्रिणींसोबत गप्पा करू शकतात.

Story img Loader