गुलाबी रंगाचा गोड कापसाचा गोळा खात केलेली टांग्याची सफर अनेकांना बालपणीच्या आठवणीत घेऊन जाते. टांगा दिसला की केवळ टांग्याची सफर करायला मिळावी म्हणून केलेला हट्ट जुन्या आठवणींना उजाळा देतो. टांग्याची लोकप्रियता वाढल्यावर अश्वपालनाला व्यावसायिक जोड मिळाली. दिसायला एकसारखेच असणाऱ्या घोडय़ांच्या जाती भारतात अनेक ठिकाणी लोकप्रिय झाल्या. अनेक वर्षांपासून पंजाबमध्ये नुकरा ही घोडय़ांची प्रजात लोकप्रिय आहे. इराण, चंगिस्तान येथून आक्रमक पंजाबमार्गे भारतात येऊ लागले. त्या काळी या प्रदेशात वारंवार युद्धे होत. त्यातूनच युद्धकलेसाठी नुकरा जातीचे घोडे विकसित झाले. गुजरातमध्ये ज्याप्रमाणे मारवाडी, काठेवाडी या घोडय़ांच्या जाती अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे अमृतसर येथे नुकरा जातीचे घोडे लोकप्रिय होत गेले. १८५४ च्या दरम्यान जोसेफ शेरर या ब्रिटिश अधिकाऱ्याने घोडय़ांचा पोलो हा खेळ भारतात सुरू केला. यावेळी या घोडय़ांचा उपयोग होऊ लागला. पंजाबमधील महाराजा रणजित सिंग यांच्याकडे लढायांसाठी नुकरा जातीचे घोडदल होते. क्वॉलिटी ऑफ जहागीरदारी फौज या नावाने ही घोडदल लोकप्रिय होती. शीख धर्मामध्ये लढाई आणि रक्षणासाठी नुकरा घोडय़ांच्या जातीला प्रचंड मागणी आहे. पूर्वी शर्यतीसाठी, लढायांसाठी या जातीच्या घोडय़ांचा उपयोग होत होता. ब्रिटिशांच्या आगमनानंतर हे घोडे जास्त लोकप्रिय झाले. सध्या हॉर्स शोमध्ये या घोडय़ांना विशेष मागणी असते.
शांत स्वभाव असला तरी तितकेच रागीट स्वभावाचे नुकरा घोडे ७० हजारापासून काही लाखांपर्यंत बाजारात उपलब्ध असतात. महाराष्ट्रातही या घोडय़ांचे ब्रीडिंग मोठय़ा प्रमाणात होते. अलीकडे व्यवसायासाठी मोठय़ा प्रमाणात अश्वपालन केले जाते. त्यात नुकरा जातीच्या घोडय़ांचे प्रमाण अधिक आहे. मूळचे पंजाबचे असल्यामुळे गहू, बाजरी, मक्का, दूध, तूप असे पौष्टिक खाणे या घोडय़ांच्या उत्तम वाढीसाठी उपयुक्त ठरते. महाराष्ट्रात सुका कचरा, हिरवे गवत, गव्हाची भुक्की असा आहार द्यावा लागतो. अश्वपालनाचा थाट करताना मात्र मालकाला घोडय़ांच्या देखभालीसाठी सजग राहावे लागते. पौष्टिक आहार आणि उत्तम व्यायाम याकडे मालकाचे काटेकोर लक्ष असणे गरजेचे असते. इतर घोडय़ांप्रमाणेच नुकरा घोडय़ांचे वास्तव्य असणारा तबेला स्वच्छ आणि कोरडा असणे आवश्यक आहे. बदलापूरमध्ये राहणाऱ्या मोनिष पाटील यांच्याकडे नुकरा जातीचा घोडा आहे.
शिकण्याची प्रबळ वृत्ती
नुकरा जातीच्या घोडय़ांमध्ये शिकण्याची प्रबळ इच्छा असते. प्रशिक्षणासाठी हे घोडे उपयुक्त असतात. इतर जातीच्या घोडय़ांपेक्षा एखादी गोष्ट आत्मसात करण्याची या घोडय़ांची क्षमता जास्त असते.
उत्सव, लग्नसमारंभात मागणी
पंजाबी, शीख धर्मीयांच्या उत्सवात, लग्नसमारंभात नुकरा जातीच्या घोडय़ांना विशेष मागणी असते. मजबूत शरीरयष्टी आणि तरणेबांड रूप यामुळे नुकरा जातीच्या घोडय़ांना उत्सवात, लग्नसमारंभात मान असतो. एखाद्या मोठय़ा उत्सवासाठी खास पंजाबमधील नुकरा जातीच्या घोडय़ांना देशभरातून मागणी असते. या घोडय़ांचे विशेष लक्षवेधी गुण म्हणजे विशिष्ट प्रकारचा नाच या घोडय़ांना शिकवला जातो. हॉर्स शो किंवा उत्सवात नुकरा जातीच्या घोडय़ांचा नाच पाहण्यासाठी गर्दी होते.
हॉर्स शोमध्ये नुकरा लोकप्रिय
पंजाबमध्ये क्रीडा प्रकारात नुकरा जातीचे घोडे वापरले जातात. कोणत्याही हॉर्स शोमध्ये शुभ्र पांढऱ्या रंगाच्या नुकरा जातीच्या घोडय़ांना अधिक पसंती दिली जाते. काळा, करडा अशा वेगवेगळ्या रंगांत हे घोडे अस्तित्वात असले तरी पांढऱ्या रंगाच्या घोडय़ांना विशेष मागणी आहे. खासगी शो आयोजित करण्यासोबतच पंजाब सरकारकडून हॉर्स शोचे आयोजन होत असते. या शोमध्ये विशिष्ट गुणांमुळे नुकरा जातीच्या घोडय़ांचा पहिला क्रमांक लागतो.
किन्नरी जाधव