लोकसत्ता प्रतिनिधी
उल्हासनगरः कल्याण ग्रामीणसह, मुरबाड, अंबरनाथ तालुक्यातील रूग्णांसाठी फायद्याचे ठरणारे उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात खाटांची संख्या अपुरी असल्याने येथे रूग्णांना जमिनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रूग्णांचे हाल सुरू आहेत. तसेच गरजू रूग्णांना क्षमता संपल्याने इतर रूग्णालयांमध्ये पाठवले जात असल्याने रूग्णांची फरफट होते आहे. उल्हासनगरच्या या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयातील असुविधांबाबत अनेकदा रूग्णांनी तक्रारी केल्या आहेत.
उल्हासनगर शहराच्या कॅम्प तीन भागात असलेले शासकीय मध्यवर्ती रूग्णालय ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचे रूग्णालय आहे. उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रूग्णालय नसल्याने याच रूग्णालयावर उल्हासनगर शहराचा भार आहे. त्यात अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह कल्याण तालुका आणि मुरबाड तालुक्यातील रूग्णांसाठी हे रूग्णालय महत्वाचे आहे. या भागातील रूग्णांसह अपघात, दुर्घटना, गुन्ह्यातील जखमी, मृतांनाही याच रूग्णालयात आणले जाते. सोबतच गुन्ह्यातील आरोपी यांचीही चाचणी याच ठिकाणी केली जाते.
हेही वाचा… बँकेतील कर्मचाऱ्याच्या डोळ्यादेखत भामट्याकडून २४ हजार रुपये लंपास
गेल्या काही वर्षात आसपासच्या भागातील लोकसंख्या वाढीचा या रूग्णालयावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात एकाच दिवसात झालेल्या १८ मृत्यूच्या घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांची स्थिती समोर येऊ लागली. त्यातच उल्हासनगरच्या या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयात बुधवारी अनेक रूग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करण्यात येत होते. त्यामुळे रूग्णांचे हाल सुरू आहेत. या रूग्णालयाची क्षमता सुमारे २०२ खाटांची असून त्यात सध्याच्या घडीला सुमारे ३०० रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा… तेरा वर्षानंतर डोंबिवलीतील विष्णुनगर मासळी बाजाराचा पुनर्विकास; दीड वर्षात नवीन इमारत उभी राहणार
क्षमतेपेक्षा अधिक रूग्ण आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी इतर पर्याय नसल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते आहे. क्षमतेपेक्षा अधिक रूग्णांची व्यवस्था होत नसल्याने अनेक रूग्णांना थेट ठाणे आणि मुंबईतील शासकीय रूग्णालयांत घेऊन जाण्याची वेळ ग्रामीण भागातील रूग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. याबाबत रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
रूग्णालयाच्या विस्ताराची प्रतिक्षा
उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात असलेल्या या मध्यवर्ती रूग्णालयाची उभारणी १९८३ साली करण्यात आली होती. सध्याच्या घडीला २०२ खाटांचे क्षमता या रूग्णालयाची आहे. या रूग्णालयातील खाटांची क्षमता वाढवण्याचा निर्णय तत्कालिन आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी २०१७ साली जाहीर केला होता. ३५० ते ४०० खाटा, अतिरिक्त कर्मचारी, अत्याधुनिक सुविधा देण्याचे आश्वासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आले होते. मात्र त्याबाबत अद्याप ठोस काहीही झालेले नसल्याची खंत रूग्णालयाचे डॉक्टरच व्यक्त करतात.