कल्याण : कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात विद्युत वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. दरवर्षी विद्युत वाहने (इलेक्ट्रिक ) खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या सुमारे १५० ते २०० आहे. या वर्षभरात सुमारे तेराशे नागरिकांनी विद्युत वाहने खरेदी केली आहेत. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर मधील मोहन अल्टिझा गृहनिर्माण वसाहती मधील १५ रहिवाशांनी विद्युत वाहने खरेदी केली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच सोसायटीत विद्युत वाहने खरेदी करण्याची कल्याण परिसरातील ही पहिलीच घटना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यावरण संवर्धन, प्रदुषण टाळण्यासाठी केंद्र शासनाने येत्या काळात विद्युत भारीत वाहने रस्त्यावर अधिक प्रमाणात धावतील याचे नियोजन केले आहे. वाहन उत्पादक कंपन्यांनी हळूहळू विद्युत वाहने उत्पादित करुन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. ही वाहने प्रदुषण करत नसल्याने आणि एकदा ही वाहने भारीत (चार्जिंग) केल्यानंतर ती एका धावेत सुमारे ९० किलोमीटर धावतात. ९० किमीच्या टप्प्यात हे वाहन भारीत केल्यानंतर पुढील धावेसाठी सज्ज होते. हे वाहन धावताना कोणताही आवाज येत नाही. धूर सोडत नाही. त्यामुळे ध्वनी, हवा प्रदुषण टाळण्यासाठी ही वाहने महत्वाची भूमिका बजावत आहेत. विद्युत वाहन चालविताना सुखद अनुभव चालकाला मिळतो. ही वाहने खरेदी करण्याकडे अलिकडे बहुतांशी नागरिकांचा ओढा वाढला आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : तिप्पट योजनेतील फसवणूक प्रकरणी आणखी एक अटकेत

मोहन अल्टिझामध्ये १५ वाहने

कल्याण पश्चिमेतील वायलेनगर मधील मोहन आल्टिझा या उच्चभ्रू वस्तीमधील रहिवाशांच्या सोसायटीत १५ व्यावसायिक, नोकरदारांनी १५ विद्युत मोटारी खरेदी केल्या आहेत. अशाप्रकारे एकाच सोसायटीत १५ विद्युत मोटारी खरेदी करणारी कल्याण परिसरातील ही एकमेव सोसायटी आहे. मोहन अल्टिझा सोसायटीचे अध्यक्ष संजय उर्फ बंटी शहा यांनी सांगितले, पर्यावरण संवर्धनाचा विचार करुन देशात, राज्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन नियमित उपक्रम राबवून नागरिकांनी पर्यावरण संवर्धण, प्रदुषण टाळण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. या उपक्रमाला सहकार्य म्हणून सोसायटीतील सदस्यांनी प्रदुषण संवर्धनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्युत मोटार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारी विकून बहुतांशी सदस्य विद्युत मोटारी खरेदी करण्याचा विचार करत आहेत. आता १५ मोटारी सोसायटीत आहेत, असे कार्यकारी सचिव मुकेशभाई उतमानी यांनी सांगितले.

खरेदीचे आकडे

कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात २०१९ मध्ये एकूण १७९ विद्युत वाहने होती. यामध्ये एक रिक्षा, १७७ दुचाकी, एक मोटार कारचा समावेश आहे. २०२० मध्ये करोना महासाथ असल्याने या कालवधीत विद्युत वाहन खरेदीत घट होऊन ही संख्या १०८ वर आली होती. यामध्ये एक रिक्षा, ७९ दुचाकी, २८ मोटार कारचा समावेश आहे. २०२१ मध्ये विद्युत मोटारींची संख्या एकूण ५९९ झाली. यामध्ये एक रिक्षा, ४७४ दुचाकी, १२४ मोटार कार यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत चार रिक्षा, ११३० दुचाकी, २५० मोटार, तीन चाकी मालवाहू वाहने पाच अशा एकूण १३८८ वाहनांचा समावेश आहे.

हेही वाचा : ठाणे : ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर

पर्यावरण विषयक जागृती होऊन विद्युत वाहने खरेदी करण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत. येत्या काळात विद्युत वाहनेच रस्त्यावर असतील असे नियोजन केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे नागरिकांचा ही वाहने खरेदी करण्याकडे ओढा वाढला आहे. -विजय साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीl कल्याण

पर्यावरण संवर्धन उपक्रमात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असला पाहिजे. हा विचार करुन सोसायटीतील सदस्यांनी विद्युत वाहने खरेदी केली आहेत. ज्या सदस्याला नवीन वाहन घ्यायचे आहे. तो विद्युत वाहन खरेदीला प्राधान्य देत आहे. -मुकेशभाई उतमानी ,कार्यकारी सचिव, वायलेनगर, कल्याण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number of electric vehicles in kalyan transport sector is 1300 in kalyan news tmb 01