अंबरनाथ : अंबरनाथ शहरात स्थानक परिसरात रिक्षांची संख्या वेगाने वाढत असून त्यात बेकायदा रिक्षाचालकांची भर पडते आहे. सर्वसामान्य प्रवाशांना याबाबत अधिक माहिती नसली तरी आता अधिकृत रिक्षाचालकांनीच बेकायदा फेरिवाल्यांविरूद्ध आंदोलनाचे हत्या उपसले आहे. रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांना जबाबदार धरत अशा रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी केली आहे. जोशीकाका रिक्षाचालक मालक संघटनेने यासाठी आंदोलन केले.

अंबरनाथ शहराचा विस्तार एकीकडे थेट उल्हासनगर, दुसरीकडे कल्याण तालुक्यापर्यंत झालेला आहे. नागरी वसाहतींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या सर्व वेशीवरच्या परिसरापर्यंत जाण्यासाठी सध्याच्या घडीला फक्त रिक्षा वाहतूक हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शहरात रिक्षा या वाहतूक व्यवस्थेचा मोठा भाग आहे. काही बेशिस्त रिक्षाचालकांमुळे सायंकाळच्या सुमारास अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात कोंडीसदृश्य परिस्थिती असते. अंबरनाथ शहराच्या प्रत्येक चौकात एक किंवा त्यापेक्षा अधिक रिक्षा थांबे आहेत. त्यातील किती थांबे अधिकृत आहेत हा मोठा प्रश्न आहे.

मात्र शहरातील अंतर्गत वाहतुकीचा भाग असल्याचे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. स्थानक परिसरात सायंकाळच्या सुमारास अनेकदा रिक्षाचालक प्रवासी दिसताच त्याला रिक्षात बसवून घेतात. त्यामुळे रिक्षा थांब्यांवर प्रवाशांची वाट पाहात थांबलेल्या प्रामाणिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर पाणी फिरते आहे. हे अनधिकृत रिक्षाचालक प्रवासी पळवत असून त्यामुळे आर्थिक नुकसान होते आहे. या रिक्षाचालकांविरूद्ध जोशीकाका रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आवाज उठवण्यात आला आहे. या रिक्षाचालकांकडे रिक्षाचा बॅच नसतो. अनेक रिक्षा या अधिकृत नसून बंद असलेल्या रिक्षा चालवल्या जात असल्याचा आरोप रिक्षा संघटनेने केला आहे. त्यामुळे अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे. या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याकडे सातत्याने दूर्लक्ष केले जाते आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या संघटनेने पोलीस आणि वाहतूक पोलिसांवरही नाराजी व्यक्त केली आहे.

Story img Loader