उल्हासनगर कॅम्प चारमधील नूतन मराठी विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे शनिवारी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी दप्तर पाठीवर न घेता शाळेत आले. शासनाचा विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर मुक्तीचा उपक्रम विद्यालय यशस्वीपणे राबवणार आहे, असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.
नूतन मराठी विद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षांची विद्यार्थ्यांना भेट द्यावी म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर काढून ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला होता. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. वाजतगाजत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. दप्तराला सुट्टी देऊन विद्यार्थी शाळेत आले होते. यापुढे दप्तर न घेता शाळेत यावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांच्या तोंडावर हास्य होते.
विद्यार्थ्यांचे दप्तर ठेवण्यासाठी व्यवस्थापनाने शाळेत स्वतंत्र कप्पे करून घेतले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दप्तरची रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली आहे, अशी महिती विद्यालयाचे अध्यक्ष उपेंद्र बोऱ्हाडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शाळेतून पुस्तकांचा संच देण्यात येईल. हा संच विद्यार्थी शाळेत ठेवतील. घरी विद्यार्थ्यांचा एक संच असेल. घरी गेल्यानंतर ते घरातील संचाच्या आधारे गृहपाठ करतील, असे बोऱ्हाडे म्हणाले.