काशीबाईंच्या वंशजांचा ‘बाजीराव मस्तानी’वर आक्षेप
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित हिंदी चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ ऐतिहासिक तथ्याच्या विपर्यास्तामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई जोशी यांच्या वंशजांनीही त्यात उडी घेतली आहे. कल्याणातील पारनाका येथील जोशी वाडय़ात काशीबाई यांचे दहा वर्षे वास्तव्य होते. याच वाडय़ात सध्या रहात असलेले काशीबाई यांचे वंशज विश्वास जोशी यांनी हा सिनेमा तथ्यहीन असल्याची टीका केली आहे. काशीबाई जोशी यांच्या पायाला इसब झाल्याने त्या लंगडत चालत. असे असताना या सिनेमात त्यांना एका गाण्यावर नृत्य करताना दाखवून निर्मात्यांनी थट्टा केल्याची टीका विश्वास जोशी यांनी केली आहे.
कल्याणातील पारनाका येथील जोशी वाडय़ात बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई जोशी यांचे वास्तव्य होते. १७२० ते १७३० या काळात बाजीरावांचे मेहुणे रामचंद्र जोशी हे कल्याणला सुभेदार होते. काशीबाई यांचे वडील महादजीपंत जोशी यांनी पेशवाईपदाच्या कामी पेशव्यांना सहकार्य केल्याने जोशांचे ऋण बाळाजी विश्वनाथ (बाजीराव पेशवे यांचे वडील) यांनी लक्षात घेऊन महादजीपंतांची मुलगी काशीबाई (लाडूबाई) हिला आपली सून करून घेतले. बाजीराव पेशवे यांचा विवाह काशीबाईंबरोबर १७७५ मध्ये कल्याणात झाला. पारनाक्यावरील जोशी वाडय़ात हा विवाह झाला. त्यावेळी लग्नकार्ये घरातच होत. वाडय़ांमध्ये ४-४ दिवस लग्नकार्याचा समारंभ चालत असे. पेशव्यांचे लग्न साहजिकच थाटामाटात होणार यात शंका नाही. पेशवे कल्याणला येणार म्हणून वऱ्हाड उतरण्यासाठी सोय म्हणून १७१४-१५ मध्ये पारनाक्यावर जोशी वाडा बांधण्यात आला. आज या वाडय़ाची जागा टोलेजंग इमारतीने घेतली आहे. श्रीनिवास साठे यांनी संपादित केलेल्या ‘कल्याण शहराचा सांस्कृतिक इतिहास’ या पुस्तकात या वाडय़ाची आणि विवाहाची विस्तृत माहिती दिली आहे.
काशीबाई जोशी यांची आज आठवी-नववी पिढी याच वाडय़ाच्या नव्या वास्तूत वास्तव्यास आहे. काशीबाईंचे वंशज विश्वास जोशी यांनी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाला आक्षेप घेतला आहे. काशीबाई यांच्या पायाला इसब झाला होता. त्यामुळे त्यांना नाचता येणे शक्यच नव्हते. परंतु या चित्रपटात काशीबाई ‘पिंगा’ गाण्यावर ठेका धरत असल्याचे दाखविण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा