कल्याण : टिटवाळा ते कल्याण बाह्य वळण रस्ते मार्गातील अटाळी येथील रस्ते मार्गात अडथळा ठरणाऱ्या ४८ चाळींमधील खोल्या दोन दिवसांच्या कारवाईत आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत तोडकाम पथकाने जेसीबाच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या. टिटवाळा ते कल्याण दरम्यानचा मागील अनेक वर्ष रखडलेला बाह्यवळण रस्ते मार्गाची बांधणी करणे यामुळे एमएमआरडीएला शक्य होणार आहे.
गेल्या महिन्यात वडवली-अटाळी बाह्य वळण रस्ते मार्गातील ११८ चाळींची बांधकामे अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने तोडून टाकली. या चाळींमधील रहिवाशांचे अन्य भागात पुनर्वसन करण्यात आले आहे. टिटवाळा ते वडवली, अटाळी या बाह्यवळण रस्ते मार्गात ५६५ चाळींची बांधकामे होती. ही बांधकामे गेल्या महिन्यात तोडण्यात आली आहेत. उरलेली ४८ बांधकामे दोन दिवसात तोडण्यात आली.
टिटवाळा ते कल्याण बाह्यवळण रस्ते मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर त्यावेळी पालिकेने अटाळी, वडवली भागातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यावेळी मार्गी लावला नाही. रहिवासी जागा सोडत नाही. त्यामुळे पालिकेला तेथे भूसंपादन करता येत नव्हते. आणि एमएमआरडीएला रस्ता बांधणी करणे शक्य होत नव्हते. या रखडलेल्या रस्ते मार्गावरून महालेखापरीक्षकांनी पालिका, एमएमआरडीएवर ताशेरे ओढले होते. योग्य ठिकाणी पुनर्वसन झाल्या शिवाय हटणार नाही, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली होती.
आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी हा रखडलेला रस्ते मार्गाचा विषय मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. रहिवाशांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी केल्यानंतर साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून वळण रस्ते मार्गातील चारशेहून अधिक बांधकामे तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. ही बांधकामे काढल्याने बाह्यवळण रस्त्याचा टिटवाळा ते कल्याण मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
बल्याणीत कारवाई
अटाळीतील रस्ते मार्गातील बांधकामे काढल्यानंतर तोडकाम पथक अ प्रभागात परतत येत असताना टिटवाळा बल्याणी येथे चोरून एका चाळीचे बेकायदा बांधकाम हाती घेण्यात आले असल्याचे साहाय्यक आयुक्त पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पथकाला थांंबवून बल्याणी येथील निर्माणाधीन चाळींचे बांधकाम जमीनदोस्त केले. तोडकाम पथक येत असल्याचे दिसताच तेथील गवंडी, भूमाफिया पळून गेले. पथकाने बांधकाम साहित्याची तोडमोड केली. बेकायदा बांधकामे करणाऱ्या भूमाफियांची बांधकामे तोडून त्यांच्यावर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही साहाय्यक आयुक्त पाटील यांनी सुरू केली आहे. आतापर्यंत पाच भूमाफियांवर टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.