डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर १५ डब्यांची लोकल आल्यानंतर या लोकलचे कल्याण बाजूकडील डबे जिन्याच्या संरक्षित कठड्याजवळ येतात. या कठड्याजवळील निमुळत्या जागेतून लोकलच्या डब्यात चढताना महिला प्रवाशांची तारांबळ उडत आहे.
फलाट क्रमांक पाचवर सकाळी गर्दीच्या वेळेत कल्याण दिशेकडून जलद लोकल आल्यानंतर डब्यात चढण्यासाठी महिला प्रवाशांची गर्दी उसळते. १५ डब्यांच्या लोकलचा महिला डबा जिन्यावरून आलेल्या संरक्षित कठड्याजवळ येऊन थांबतो. त्यामुळे लोकलचा डबा आणि संरक्षित कठडा यांच्यामध्ये फक्त तीन ते चार फुटाची मोकळी जागा असते. त्या मोकळ्या जागेतून एका वेळी ६० ते ७० महिला डब्यात चढण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी चेंगराचेंगरी होऊन एखादी महिला फलाटावर पडली, तर अपघात होण्याची भीती महिलांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिन्यावरून फलटाच्या दिशेने आलेल्या संरक्षित कठड्याचा रेल्वे प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी महिला प्रवाशांकडून केली जात आहे.