लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्राच्या बाहेर प्रवासी मार्गिकेत दुतर्फा प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुचाकी उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे आरक्षण केंद्रात जाताना कसरत करावी लागते.

रेल्वे आरक्षण केंद्राच्या बाहेर प्रवासी दुचाकी वाहने आणून लावतात हे रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना दिसत नाही का, या दुचाकी वाहनांना आरक्षण केंद्राच्या बाहेर ठेवण्यास जागा देऊन रेल्वे प्रशासन या वाहन चालकांकडून भाडे आकारते का, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

हेही वाचा… डोंबिवलीत पाथर्ली नाक्यावरील विवाह मंडपाचा वाहतुकीला अडथळा, एक महिन्यापासून मंडप रस्त्यावर

मध्य रेल्वे स्थानकावरील डोंबिवली स्थानक हे सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण आहे. या स्थानकातील पाचही फलाटांवर प्रवाशांना येण्या जाण्यासाठी मोकळे वातावरण असेल, अशा पध्दतीने रेल्वे स्थानकांवर कोणतेही अडथळे राहणार नाही याची काळजी रेल्वे प्रशासन घेते. अशा परिस्थिती रेल्वेच्या मुख्य प्रवेशव्दारातून आत येऊन आरक्षण केंद्राच्या बाहेर दुचाकी प्रवाशांकडून उभ्या करुन ठेवण्यात येत असतील तर त्यांच्यावर प्रशासन कारवाई का करत नाही. अशा दुचाकींमध्ये एखादे संशयास्पद दुचाकी वाहन रेल्वे स्थानकात कोणी आणून ठेवले तर त्याची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

हेही वाचा… भावली धरणाचे काम संथगतीने; पर्यावरण मंजुऱ्यांचा खोडा, ठाण्याचा ग्रामीण पट्टा तहानलेलाच

डोंबिवली पश्चिमेत कोपर पुलाजवळ रेल्वेचे प्रशस्त वाहनतळ आहे. त्या ठिकाणी हे वाहन चालक वाहने का उभी करत नाहीत. त्या ठिकाणी दैनंदिन वाहने उभी करण्याची सुविधा आहे. शेकडो वाहने दररोज या ठिकाणी उभी असतात. प्रवाशांना अडथळा येईल अशा पध्दतीने वाहने उभी करुन ठेवण्यात दुचाकी वाहन चालक पुढाकार का घेत आहेत.

वाहनतळ रखडले

डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानकाजवळ एकही वाहनतळ नाही. खासगी वाहनाने रेल्वे स्थानकापर्यंत येणाऱ्या नोकरदारांना रेल्वे स्थानका लगतच्या रस्त्यांवर वाहने उभी करुन कामावर जावे लागते. डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारासमोर मासळी बाजार आणि डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाची वास्तू आहे. या दोन्ही वास्तू पाडून त्या ठिकाणी समुह विकासातून मासळी बाजार, वाहनतळ, प्रशस्त ग्रंथालय उभी करण्याचे नियोजन काही वर्षापूर्वी पालिकेने केले होेते.

हा प्रकल्प विकसित करण्यासाठी आम्हालाच मिळाला पाहिजे यासाठी काही राजकीय मंडळी अडून बसली आहेत. तसेच, मासळी बाजारात काही राजकीय मंडळींचे गाळे आहेत. ते गाळे त्यांना सहजरित्या मिळू नयेत म्हणून शहरातील काही राजकीय मंडळी या महत्वपूर्ण प्रकल्पात मागील २० वर्षापासून अडथळे आणत आहेत. त्यामुळे शहरातील हे महत्वपूर्ण प्रकल्प राजकीय रस्सीखेचीमध्ये अडकले आहेत. दोन वर्षापूर्वी मासळी बाजाराचा प्रकल्प मंजुरीच्या अंतीम टप्प्यात होता पण पालिकेतील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने तो हाणून पाडला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obstruction of two wheelers to the reservation center at dombivli western railway station dvr