डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा ते रुणवाल गार्डन परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचे पदपथ जाहिरात फलक, या भागात सुरू असलेल्या गृहसंकुलांचे बांधकाम साहित्य, महावितरणच्या उच्च दाब वीज वाहिन्यांच्या वेट्टोळ्या तारा यांनी व्यापून गेले आहेत. त्यामुळे या भागातून रस्त्याच्या दुतर्फा चालताना नागरिकांना रस्त्याच्या कडेने वाहनांनापासून अंतर ठेऊन जीव धोक्यात घालून चालावे लागते.
शिळफाटा रस्त्यावर मेट्रो मार्ग उभारणीची कामे सुरू आहेत. या कामाची साधन सामुग्री रस्त्याच्या मध्यभागी आहे. रस्त्याच्या दुभाजक दिशेने धावणारी वाहने अरूंद रस्त्यामुळे आता रस्त्यांच्या कडेने धावत असतात. एमआयडीसी, २७ गाव भागातील कामगार, नागरिक, शिळफाटा रस्त्यालगतच्या गृहसंकुलातील अनेक नागरिक मानपाडा ते रुणवाल गार्डन आणि पुढील भागात पायी प्रवास करतात. अनेक वेळा नागरिकांना रिक्षा मिळणे दुरपास्त होते. त्यामुळे वाहनाची वाट न पाहता घरचा, कामाच्या ठिकाणचा प्रवास पायी करतात.
शिळफाटा रस्त्यावरून सतत वाहनांची येजा असते. बहुतांशी नागरिक या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावरून चालण्याचा प्रयत्न करतात. परंतु, मानपाडा ते रुणवाल गार्डन दरम्यानच्या भागात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथांवर स्थानिक लोकप्रतिनिधी, तथाकथित दादा, भाई यांच्या वाढदिवसाचे फलक पदपथ अडवून लावलेले आहेत. या भागात काही गृहसंकुलांची कामे सुरू आहेत. या बांधकामांचे लोखंड, ग्रीट, अडगळीचे साहित्य पदपथावर टाकून ठेवण्यात आले आहे. काहींनी आपल्या गृहसंकुलांच्या जाहिरातींचे फलक पदपथावर एक ते दोन फूट पुढे आणून लावले आहेत. त्यामुळे अरूंद पदपथावरून पादचाऱ्यांना चालणे शक्य होत नाही.
काही ठिकाणी महावितरणच्या वेट्टोळ्या वाहिन्या पदपथाच्या बाजुला आणि पदपथाला अडसर होईल अशा पध्दतीने रचना करून ठेवल्या आहेत. या अडगळीच्या मार्गातून वाट काढत पदपथावरून चालणे नागरिकांना शक्य होत नाही. काही ठिकाणी पदपथ आहेत तर तेथील फरशा, पेव्हर ब्लाॅक निघाले आहेत. त्यामुळे तो भाग समतल नाही. या भागातून पायी गेले तर पाय मुरगळण्याची भीती नागरिक व्यक्त करतात. नागरिक, वृध्द तर या रस्त्यावरून चालू शकत नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे, असे या भागातून नियमित पायी जाणाऱ्या पादचाऱ्यांनी सांगितले.
मेट्रो मार्गाची कामे येणाऱ्या दोन ते तीन वर्ष सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी सुस्थितीत राहतील यासाठी राज्य रस्ते विकास महामंंडळ, एमएमआरडीए, कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा ते रुणवाल गार्डनच्या दरम्यानच्या पदपथावर विविध प्रकारची अडगळ आहे. पदपथ असुन ते अडगळीने गायब आहेत. शिळफाटा रस्त्यावरील वाहनांचा वाढता भार, पायी जाणारे प्रवासी यांचा विचार करून संबंधित यंत्रणेने या भागातील पदपथ मोकळे राहतील यासाठी प्रयत्न करावेत.- श्रीकांत जोशी, स्थानिक रहिवासी.