लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवक, अनेक पदाधिकारी तसेच काँग्रेस नेते, माजी महापौर नईम खान यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहिर प्रवेश केला असतानाच, त्यापाठोपाठ नईम खान यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक मिराज खान यांच्यासह पदाधिकारी अ‍ॅड. संगिता पालेकर-दवणे आणि मनिषा भगत यांनी बुधवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्यानिमित्ताने आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांना पुन्हा धक्का दिल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर कळवा मुंब्रा भागाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची साथ दिली. तर, एकेकाळी त्यांचे कट्टर समर्थक असलेले आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांनी अजीत पवार यांची साथ दिली. यामुळे ठाण्यात आव्हाड विरुद्ध परांजपे, मुल्ला असा सामना पहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेत एकूण नगरसेवकांची संख्या १३१ इतकी आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे ६७ तर, राष्ट्रवादीचे ३४ नगरसेवक निवडुण आले होते. पालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाची ओळख होती. तसेच राष्ट्रवादीच्या निवडुण आलेल्या ३४ पैकी २६ नगरसेवक कळवा-मुंब्रा भागातील होते. या भागाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे करतात. हा मतदार संघ त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अगामी विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांच्याविरोधात निवडणुक लढण्याची तयारी अजित पवार गटाकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार गटाने आव्हाड यांच्या गटातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावत पक्ष प्रवेश देण्याची मालिका सुरू केली आहे.

आणखी वाचा-Ganesh Naik : लोकसभा निवडणुकीत महायुतीवरील लोकांचे प्रेम कमी झाले, आमदार गणेश नाईक यांच्या महायुती बैठकीत कानपिचक्या

काही दिवसांपुर्वी कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवक, अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसचे नेते, ठाणे महापालिकेचे माजी महापौर नईम खान यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यापाठोपाठ आता त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक मिराज खान यांच्यासह पदाधिकारी अ‍ॅड. संगिता पालेकर-दवणे आणि मनिषा भगत यांनी बुधवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहिर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला असून या दोन्ही नेत्यांनी या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांना पुन्हा धक्का दिल्याचे चित्र आहे. मिराज खान यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी, अ‍ॅड. संगिता पालेकर-दवणे यांची मुंब्रा-कळवा महिला विधानसभा अध्यक्षा पदी आणि मनिषा भगत यांची ठाणे शहर (जिल्हा) महिला कार्याध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader