डोंबिवली- डोंबिवलीतील रामनगरमध्ये कार्यालय असलेल्या सारथी फायनान्स कन्सलटन्सी सर्व्हिसेस या खासगी वित्तीय संस्थेच्या साहाय्यक शाखा व्यवस्थापकाने सारथीकडून कर्ज घेतलेल्या कर्जदारांना स्वताच्या बँक खात्यावर कर्ज हप्त्याची रक्कम भरणा करण्यास सांगितली. ही एक लाख ८४ हजार रुपयांची रक्कम सारथी फायनान्स एजन्सीत भरणा न करता स्वतासाठी वापरुन कर्जदार आणि सारथी फायनान्स वित्तीय संस्थेची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> ठाणे : कशेळी खाडी पुलावर माती आणि रेतीच्या ढिगाऱ्यांमुळे अपघातांची भिती
रुपावली करसन सत्रा (४४, रा. लक्ष्मी नारायण रेसेडन्सी, मुंब्रा देवी रोड, वरेकर शाळेजवळ, दिवा पूर्व) असे वित्तीय संस्थेची फसवणूक करणाऱ्या साहाय्यक शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे. धम्मपाल मुरलीधर मगरे (३५, कार्यालय- सारथी फायनान्स, सय्यद इमारत, राजाजी गल्ली क्रमांक एक, स्वामी नारायण मंदिराजवळ, रामनगर, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे. नोव्हेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हा गैरव्यवहार घडला आहे. पोलिसांनी सांगितले, रुपावली सत्रा या सारथी फायनान्स संस्थेत साहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या. सारथी फायनान्स वित्तीय संस्थेतून ४० कर्जदारांनी गरजेप्रमाणे कर्ज घेतले होते.
हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील आईस फॅक्टरी रस्त्याच्या पुढच्या टप्प्याला मंजुरी
या कर्जाचे हप्ते हे ग्राहक दरमहा फेडत होते. साहाय्यक शाखा व्यवस्थापन रुपवाली यांनी या ४० कर्जदारांशी परस्पर संपर्क करुन त्यांना त्यांचे सारथीचे कर्ज हप्ते प्रत्यक्ष शाखेत येऊन भरण्यापेक्षा स्वताच्या गुगल पे, फोन पे खात्यात, रोख स्वरुपात स्वीकारणे सुरू केले. सारथीचा अधिकारी आपणाकडून कर्ज रक्कम घेतो म्हणून तिने सांगितल्याप्रमाणे कर्जदारांनी रक्कम तिच्या स्वाधीन केली. हा प्रकार शाखा व्यवस्थापकांना कळणार नाही याची काळजी सत्रा यांनी घेतली. बँकेचे लेखापरिक्षण करताना हा प्रकार निदर्शनास आला. कर्ज हप्ते न फेडणाऱ्या कर्जदारांना सारथीमधील इतर कर्मचारी संपर्क करुन कर्ज हप्ते फेडण्यास सांगू लागले. त्यावेळी कर्जदारांनी आम्ही साहाय्यक शाखा व्यवस्थापक रुपवाली यांच्याकडे रक्कम जमा केली आहे असे सांगण्यास सुरुवात केली. सुरुवातीला रुपवाली यांनी त्याचा इन्कार केला. परंतु कागदोपत्री रुपवाली यांनीच कर्जदारांकडून रक्कम वसूल केल्याचे सिध्द झाल्यावर शाखा व्यवस्थापक मगरे यांनी रुपवाली यांच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात सारखी फायनान्स संस्थेची आणि कर्जदारांची एक लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरू केली आहे.