ठाणे : घोडबंदर घाटात बुधवारी पहाटे तेल सांडल्याने त्याचा परिणाम सकाळपासून जाणवू लागला आहे. भाईंदर पाडा ते मानपाडा पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. घोडबंदरच्या कोंडीतून सुटका केव्हा मिळेल अशी विचारणा नागरिक करत आहेत.
ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गेवर तेल सांडले आहे. येथील वाहतूकीचा खोळंबा झाला असून भाईंदर पाडा ते मानपाडा पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून बोरिवली, वसई, भाईंदर, पालघरच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले आहेत. सकाळी ही वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा…ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रथांचे प्रकाशन, गडकरी रंगायतन परिसरात मोठे वाहतूक बदल
अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत आहे. शाळेच्या बस गाड्या तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने या कोंडीत अडकून आहेत. मागील काही दिवसांपासून ठाण्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे या कोंडीतून सुटका केव्हा मिळेल अशी विचारणा नागरिक करत आहेत.