ठाणे : ठाण्यातील मोक्याच्या जागेवरील जुन्या इमारती विशिष्ट बिल्डरांच्या घशात घातल्या जात असून त्याचबरोबर सुस्थितीतील इमारतींना अतिधोकादायक ठरविणारे काही स्ट्रक्चरल ऑडिटर आणि महापालिका काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे, असा गंभीर आरोप भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया दोन दिवसांपूर्वी अशाचप्रकारच आरोप केला होता, त्यापाठोपाठ आता पवार यांनी केलेल्या आरोपामुळे महापालिकेचे संबंधीत अधिकारी अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठाणे महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटरची यादी करून ठाण्यातील रहिवाशांना यादीतील ऑडिटरकडून इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आवाहन केले होते. राज्य सरकारच्या नियमानुसार, अतिधोकादायक इमारतींसाठी सी-१, इमारत रिकामी करून दुरुस्ती करण्यासाठी सी-२ ए, इमारतीत राहून दुरुस्ती करण्यासाठी सी-२ बी, किरकोळ दुरुस्तीसाठी सी-३ अशी वर्गवारी करण्यात आली होती.

परंतु, महापालिकेच्या निर्णयाचा सर्रासपणे गैरफायदा घेण्याचे काम काही विशिष्ट स्ट्रक्चरल ऑडिटर कंपनी आणि काही महापालिका अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन केले. त्यानुसार शहरातील मोक्याच्या जागांवरील सुस्थितीतील इमारती बिनदिक्कतपणे धोकादायक ठरविल्या जात आहेत. सी-३, सी-२ बी, सी-२ ए श्रेणीतील इमारती सी-१ या अतिधोकादायक वर्गात टाकण्यासाठी काही बिल्डर आणि महापालिकेतील काही अधिकारी कार्यरत आहेत, असा आरोप पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

बिल्डरांच्या स्वाधीन केल्या जातात इमारती

धोकादायक इमारतींबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला जातो. तर सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजिनिअरकडून प्रत्यक्ष इमारतीची पाहणी न करताच, त्या सी-१ या अतिधोकादायक वर्गात टाकल्या जात आहेत. त्यानंतर वाढीव `एफएसआय’चा फायदा घेऊन स्थानिक रहिवाशी आणि दुकानदारांवर दबाव निर्माण करून इमारती रिकाम्या करून बिल्डरांच्या स्वाधीन केल्या जात आहेत. शहरात बिल्डरांची सुपारी घेऊन काही स्ट्रक्चरल ऑडिटरच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत, असा आरोपही पवार यांनी केला आहे.

ऑडिटरने अतिधोकादायक ठरविलेल्या इमारतींची छाननी करा

गेल्या दोन-तीन वर्षात पाचपाखाडी भागातील अनेक इमारती अशाच पद्धतीने अतिधोकादायक ठरवून पाडल्या गेल्या. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन, गेल्या पाच वर्षात स्ट्रक्चरल ऑडिटरने अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतींची छाननी करावी. तसेच यापुढील काळात स्ट्रक्चरल ऑडिटरकडून दाखल होणाऱ्या प्रस्तावांची त्रयस्थ संस्थांकडून चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

झोपडीचेही झाले होते ऑडिट

काही महिन्यांपूर्वी महापालिकेचे निवृत्त सहायक आयुक्त आणि बिल्डरच्या संगनमताने गणेशवाडीतील एका ३५ ते ४० वर्षांपूर्वीच्या झोपडीवजा घराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा पराक्रम करण्यात आला होता. या झोपडीचे ऑडिट संशयास्पद होते. त्यानंतर ही झोपडी तोडून त्या कुटुंबाला बेघर करण्यात आले. त्यानंतर तेथे इमारतीचे काम सुरू करण्यात आले. नव्या इमारतीत झोपडीवासियाला घरही दिलेले नाही, असा गंभीर घडला असल्याचे नारायण पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

चौकशीची मागणी

ठाण्यात ज्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो, त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यापाठोपाठ भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनीही अशाच प्रकारचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे शहरातील पाचपाखाडीसह विविध भागातील मोक्याच्या जागेवरील जुन्या इमारती अतिधोकादायक ठरवून काही विशिष्ट बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत, असा आरोप पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. तसेच या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.