डागडुजी करण्याची दुर्गमित्रांची मागणी
वसई किल्ल्यातील गोन्सालो गार्सिया या चर्चचा भाग असलेले पोर्तुगीजकालीन महाविद्यालय सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. १५व्या शतकातील या महाविद्यालयाच्या वास्तूचे अनेक दगड निखळले असून वास्तूत खुरटी झुडपे उगवली आहेत. या पुरातन वास्तूची डागडुजी करण्यात यावी, नाही तर वसईचा हा ठेवा नामशेष होईल, असे दुर्गमित्रांनी सांगितले.
गोन्सालो गार्सिया चर्चला संलग्न असलेल्या महाविद्यालयाची ही वास्तू आहे. घुमटाकृती बांधकाम, वर्तुळाकार जिना, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, मोठा सभामंडप, प्रार्थनास्थळे, टोलेजंग मनोरा यांचा समावेश या वास्तूत आहे. या वास्तूकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि घुमटाकृती छताला मोठी तडा गेली असून त्याची पडझड होण्याची शक्यता आहे.
वसई किल्ल्यात मद्यपी, प्रेमी युगूल, फिरस्ते यांचा वावर वाढला असून त्यांच्याकडून किल्ल्याला हानी पोहोचवली जाते. त्यांच्यावर पोलिसांनी व महापालिकेने नियंत्रण ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संत गोन्सालो गार्सिया चर्चमध्ये दर वर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या निमित्त शेकडो भाविक येथे जमा होतात. जर या वास्तूची पडझड झाली तर मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
महाविद्यालयाची वैशिष्टय़े
- हे महाविद्यालय १५व्या शतकात बांधण्यात आले.
- येथे विद्यार्थ्यांना भाषाशास्त्र, व्याकरण, धर्मशास्त्राचे शिक्षण दिले जात होते.
- महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या राहण्याचीही व्यवस्था होती.
वसई किल्ल्यातील अनेक वास्तू धोकादायक स्थितीत आहेत. पुरातत्त्व विभागाने या वास्तूंची यादी करून त्यांची डागडुजी करण्याची गरज आहे. जर या वास्तूंची डागडुजी केली नाही, तर किल्ल्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्यास वेळ लागणार नाही.
– डॉ. श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक
येत्या काही दिवसांत वसई किल्ल्यातील अनेक वास्तूंच्या डागडुजीची आखणी करण्यात येणार आहे. त्याचा अभ्यास करून योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.
– कैलास शिंदे, वसई पुरातत्त्व विभागातील अधिकारी