कळव्यातील तरुणाच्या ‘संगणकदान’ मोहिमेला शतकी यश
वरच्या इयत्तेत गेलेल्या परिचितांची पुस्तके वापरून अभ्यास करण्याची प्रथा आपल्याकडे बऱ्याच वर्षांपासून रूढ आहे. मात्र, सध्याच्या शिक्षणपद्धतीने माहिती तंत्रज्ञानातील साधनांचा मार्ग अनुसरल्याने अशी मदतसाखळी हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे. हीच बाब हेरून कळव्यातील एका तरुणाने संगणकदानाची कल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याने ‘डोनेटयुअरपीसी’ हे संकेतस्थळ सुरू केले असून त्याद्वारे जुने संगणक दान करून ते गरजू, गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दीड वर्षांच्या काळात या संकेतस्थळाच्या माध्यमातून शंभरहून अधिक ‘सेकंडहॅण्ड’ संगणक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकले आहेत.
संगणकीय तंत्रज्ञानात दिवसागणिक प्रगती होत असल्याने काही महिन्यांतच वापरात असलेले संगणक बदलण्याची वेळ ओढवते. विशेषत: कॉपरेरेट क्षेत्रात हे प्रमाण अधिक आहे. अशावेळी जुने झालेले संगणक कवडीमोल दरात विकले जातात अथवा कचऱ्यात फेकले जातात. अशा प्रकारे संगणक किंवा तत्सम साधने कचऱ्यात टाकण्यामुळे शहरांतील ई-कचऱ्याची समस्याही वाढू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर, जुने संगणक विकण्या वा फेकण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना पुरवून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लावण्याची संधी ‘डोनेटयुअरपीसी’ सारख्या संकेतस्थळाने मिळवून दिली आहे.
कार्यालयीन कामकाजासाठी कालबाह्य झालेले संगणक विद्यार्थ्यांसाठी मात्र उपयुक्त असतात. हीच बाब हेरून हैदराबादमधील अभिजित अस्थाना या तरुणाने २००८मध्ये ही संगणकदानाची ऑनलाइन चळवळ सुरू केली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. मात्र, पुढे अभिजितच्या व्यग्र दिनक्रमामुळे ही मोहीम सक्रिय राहू शकली नाही. ही गोष्ट कळव्यात राहणाऱ्या तुषार जाधव या व्यवसायाने ग्राफिक डिझायनर असलेल्या तरुणाच्या लक्षात आली व त्याने ही चळवळ नव्याने सुरू केली.
कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना इच्छा असूनही शैक्षणिक कारकिर्दीत संगणक वापरता येत नाही. संगणक ही त्यांच्यासाठी दुर्लभ गोष्ट असते. तुषार विद्यार्थीदशेत असताना या अनुभवातून गेला होता. त्याच्या आजोबांनी कर्ज काढून त्याला संगणक घेऊन दिला होता. साहजिकच संगणकाअभावी अनेक विद्यार्थी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रापासून दूर राहतात, या वास्तवाची त्याला जाणीव होती. त्यामुळे संकेतस्थळाच्या माध्यमातून संगणक हस्तांतरणाच्या या मोहिमेविषयी समजताच त्याने त्यात रस दाखवून ‘डोनेटयुवरपीसी’ चळवळ पुन्हा सुरू केली. या दुसऱ्या पर्वातही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून दीड वर्षांतच शंभरएक संगणक गरजूंपर्यंत पोहोचविले आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या विविध भागातून या संकेतस्थळास प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुषारने समाधान व्यक्त केले.
असे होते हस्तांतरण
‘डोनेटयुवरपीसी डॉट इन’ (http://donateyourpc.in) या संकेतस्थळावर कुठे कुठे संगणकांची आवश्यकता आहे, त्याची माहिती नोंदवली जाते. त्यासाठी प्रसारमाध्यमांचा आधार घेतला जातो. ते पाहून दाते प्रतिसाद देतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील संगणक तुषार स्वत: घेऊन येऊन संबंधितांना देतो. जेट एअरवेज कंपनीने या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून अकोल्यातील अमृत कलश शाळेला २० संगणक दिले. कंपन्यांप्रमाणे व्यक्तिगतरीत्याही संगणक दिले जातात. साधारणपणे चालू स्थितीत असलेले संगणक स्वीकारले जातात. किरकोळ दोष असेल तर मी स्वत: दुरुस्त करून घेतो, अशी माहिती तुषारने दिली. फेसबुकवरही ‘डोनेटयुवरपीसी’चे विशेष पेजदेखील आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा