ठाणे : वीज मीटरबाबतच्या तक्रारी कमी व्हाव्यात. यासाठी कळवा, मुंब्रा आणि शीळ भागातील वीज मीटर टप्य्याटप्प्याने बदलून त्याठिकाणी अत्याधुनिक नवे वीज मीटर बसविणार असल्याचे टोरंट पाॅवर कंपनीने स्पष्ट केले आहे. नवीन मीटरमध्ये वाचन (रिडींग) अचूक येत असून दोन महिन्यांचा वीज वापराचा तपशीलही त्यात तपासता येऊ शकते. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियमानुसार, प्रत्येक वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या आवारात बसवलेले मीटर योग्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. ज्या वीज मीटरमध्ये काही बिघाड असेल. असे मीटर वेळोवेळी कंपनीने स्वतः किंवा ग्राहकांच्या विनंतीनुसार बदलणे आवश्यक आहे. त्यानुसार, विद्युत देयकाची अचूकता दाखविण्यासाठी टोरंट पाॅवर कंपनीने जुने मीटर टप्प्याटप्प्याने बदलण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, कळवा, मुंब्रा आणि शीळ भागातील २० हजारहून अधिक ग्राहकांचे जुने मीटर बदली करायचे आहेत. मीटर बदलण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. असे टोरंट पाॅवर कंपनीने स्पष्ट केले आहे.
नव्या मीटरमध्ये प्रत्येक तासाचे युनिट तपासण्याची सोय आहे. तसेच या मीटरमध्ये एक बटण देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने देण्यात आले आहे. वीजेचा भार कमीजास्त झाल्यास घरातील उपकरणांना धोका होऊ नये यासाठी याचा फायदा होऊ शकतो. नवीन मीटरमुळे ग्राहकाला तो जेवढा वापर वीजेचा करणार तेवढ्याच युनिटचे अचूक देयक ग्राहकाला मिळणार आहे.