लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : येथील पूर्व भागातील विजयनगर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या पतीने आपल्या मुलीच्या दोन मित्रांची मदत घेऊन अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न शुक्रवारी केला. होरपळलेल्या ज्येष्ठ नागरिकावर नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी मृत्यू झाला.या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.
हरिश्चंद्र काशिनाथ पवार (६१) असे मरण पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या हत्येच्या आरोपावरून त्यांची पत्नी अश्विनी पवार (५९) आणि त्यांच्या मुलीचे मित्र सिद्धेश सूर्यवंशी आणि रितेश चव्हाण यांच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आणखी वाचा-विशेष नागरी वसाहती करसवलतीविनाच! विकासकाकडे शुल्क भरूनही ग्राहकांवर मालमत्ता कराचा भार
हरिश्चंद्र एका आस्थापनेमधून निवृत्त झाले होते. त्यांना निवृत्ती वेतन मिळत होते. या निवृत्ती वेतनावरून हरिश्चंद्र आणि त्यांची पत्नी अश्विनी यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होते. संपूर्ण निवृत्त वेतन आपल्या ताब्यात द्यावे, असे अश्विनीचे म्हणणे होते. संपूर्ण रक्कम देण्यास हरिश्चंद्र तयार नव्हते. या विषयावरून त्यांच्यात जोरदार भांडण होत होते, असे पोलिसांनी सांगितले.
हरिश्चंद्र यांच्या घरी त्यांच्या मुलीचे मित्र सिद्धेश आणि रितेश हे दोघे नियमित येत असत. त्यांनी आपल्या घरी येऊ नये अशी आक्रमक भूमिका हरिश्चंद्र यांनी घेतली होती. हरिश्चंद्र यांच्या या भूमिकेमुळे अश्विनी संतप्त होती. पती आपल्याला निवृत्ती वेतन देत नाही आणि मुलीच्या मित्रांना घरी येण्यास नकार देतो. या रागातून अश्विनी हिने शुक्रवारी आठ वाजता सिद्धेश आणि रितेश या दोघांना घरी बोलविले. त्यांनी हरिश्चंद्र यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला. अश्विनीने त्या ज्वलनशील पदार्थाला आग लावली. अचानक घडलेल्या या घटनेने हरिश्चंद्र अस्वस्थ झाले. त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा शेजारी धावत आले. त्यांनी हरिश्चंद्र यांच्या अंगावर पाणी ओतून आग विजवली. स्थानिक रूग्णालयात प्राथमिक उपचार करून हरिश्चंद्र यांना तातडीने वाशी येथील बर्न रूग्णालयात दाखल करण्यात आले. ते ९० टक्क्याहून अधिक भाजले असल्याने त्यांचा रविवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उपचारापूर्वी हरिश्चंद्र यांनी पोलिसांना जबाब दिला आहे. त्यात पत्नी अश्विनी ही निवृत्ती वेतनावरून आपल्याशी सतत भांडण करत होती. त्यात मुलीचे दोन मित्र आपल्या घरी सतत येत होते. या वादातून हा सगळा प्रकार घडला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.