सुट्टी लागली की अनेकांचे पाय जसे गडकिल्ले, नैसर्गिक पर्यटनस्थळांकडे वळतात, त्याप्रमाणे काही जणांना धार्मिक देवस्थान, मंदिर यांना भेट द्यायला आवडतं. ही धार्मिक स्थळे जशी श्रद्धेचा भाग असतात, तशी पर्यटनाच्या दृष्टीनेही अनेक जण या स्थळांना भेट देत असतात. सध्या चैत्र नवरात्र उत्सव अनेक ठिकाणी सुरू आहे. या दरम्यान अनेक श्रद्धाळू लोक विविध ठिकाणच्या देवी मंदिरांना भेट देत असतात. वसई परिक्रमामध्येही आपण अशाच एका सुंदर, पुरातन मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. वसईच्या अलीकडे जूचंद्र गावातील एका डोंगरावर हे चंडिका देवीचे प्राचीन मंदिर पाहायला मिळते.

जूचंद्र गावाच्या पूर्वेस समुद्रसपाटीपासून ४०० फूट उंचीवर, डोंगरावर, चंडिका देवीचे हे मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे काहींचे मत आहे. मात्र तसा दस्तऐवज नाही. प्रचंड शिलाखंडाच्या गुहेत असलेल्या या पुरातन मंदिरात चंडिका, कालिका,  महिषासुरमर्दिनी, गणेश यांच्या पाषाण मूर्ती आहेत. या मूर्ती पूर्वाभिमुख असून सध्या या पाषाणावर भव्य मुखवटे चढवले असून त्यावर देवींना साजशृंगार, साडीचोळी नेसवली जाते. या डोंगराचा आकार नीट पाहिल्यास एखाद्या माशाप्रमाणे दिसतो. सुरुवातीला इथे डोंगरावर एका कपारीत देवीचे आणि श्रीगणेशाचे स्थान होते. कालांतराने यात सुधारणा होत मंदिराचे आजच स्वरूप बांधले गेले. आता मूर्तीसमोर प्रशस्त असा सभामंडप बांधण्यात आला आहे. डोंगराच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात भातशेतीचे वाफे, मिठागरे पाहायला मिळतात. पावसाळ्यात डोंगरावरून चारी बाजूचे हे दृश्य अधिक विहंगम वाटते.

साठ-सत्तर वर्षांपूर्वी डोंगरावर जायला धड पायवाटही नसल्याचे स्थानिक मंडळी सांगतात. कडेकपारींचा आधार घेत जेमतेम एकावेळी एकच माणूस, कसाबसा देवींच्या या पाषाणापाशी पोहोचू शकत असे. मात्र २००२ साली मंदिराचे नूतनीकरण करताना इथे भक्तांच्या सोयीसाठी पाच मजली इमारत बांधताना ज्येष्ठ नागरिक, अपंग आजारी लोकांचा विचार करून, लिफ्टची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिराच्या पश्चिमेकडून डोंगरावर येण्यासाठी पायऱ्यांची सोय उपलब्ध आहे. साधारण दोनशे पायऱ्या चढाव्या लागतात. डोंगराच्या एका बाजूने थेट मंदिरापर्यंत रस्ता असल्याने वाहन घेऊनही वर जाता येते. पार्किंगची चांगली सोय मंदिर प्रशासनातर्फे इथे करण्यात आली आहे. पाण्याची तसेच प्रासादाचीही चांगली सोय मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आल्याने इथे भाविकांची योग्य काळजी घेतल्याचे पाहायला मिळते. मंदिरातर्फे दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमही राबवले जातात.

दरवर्षी अश्विन आणि चैत्र महिन्यात येणारी नवरात्र मोठय़ा उत्साहात आणि भक्तिभावाने इथे साजरी होते. चैत्र महिन्यात तर इथे मोठी यात्रा भरते. खूप दूरदूरहून या यात्रेला लोक येत असतात. या दरम्यान इथे मोठय़ा प्रमाणात स्थानिक जूचंद्र गावातील काही तरुण मंडळी रांगोळी चितारतात. ती पाहण्याचीही उत्सुकता अनेक मंडळींना इथे घेऊन येते. या वर्षीही २ एप्रिलपासून चैत्र यात्रोत्सव सुरू होणार असून, तीन दिवस ही यात्रा चालणार आहे. या तीन दिवसांत मंदिर व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या मंदिराकडे जाण्यासाठी एक तर वसई स्थानकावरून जाता येते किंवा ठाणे वसई-दिवा या मार्गावर जूचंद्र स्थानकावर उतरून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर पायीही चालत जाऊन तुम्ही डोंगरापाशी पोहोचू शकता. रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील नायगाव स्थानक पूर्वेकडे उतरून शेअर किंवा वैयक्तिक रिक्षा करूनही तुम्हाला जूचंद्र गावातील या चंडिका मंदिराकडे जाता येत. खासगी गाडीने येत असाल तर महामार्गाने येताना जूचंद्र फाटय़ावर वळून मंदिराकडे थेट पोहोचता येत. मंदिराच्या आसपास काही छोटी छोटी हॉटेल्स आहेत, पण तरी स्वत:कडे पाणी आणि खाण्याचा डबा असला तर अधिक उत्तम.

truptiar9@gmail.com