नातू १२ वी उत्तीर्ण झाल्याने मिठाई आणण्यासाठी गेलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला भामट्यांनी पैशांचे अमीष दाखवून तिची सोनसाखळी लुटून नेल्याचा उघडकीस आला. ठाणे स्थानक परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरूवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
फसवणूक झालेली वृद्धा खारटनरोड भागात राहते. काही दिवसांपूर्वीच १२ वीचा निकाल लागला. वृद्धेचा नातूही या परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे परिसरात मिठाई वाटण्यासाठी वृद्धा ठाणे स्थानक परिसरातील मिठाईच्या दुकानात आली होती. त्याचवेळी एक १७ ते १८ वर्षीय मुलगा त्यांच्याकडे आला. अंधेरीला जायचे असून तिकीटासाठी पैसे नसल्याचे त्या मुलाने वृद्धेला सांगितले. त्या मुलाला मदत करण्यासाठी वृद्धेने त्याला तिकीट काढण्यास नेले. त्याचवेळी एक भामटा तिथे आला.
“हा मुलगा खूप श्रीमंत आहे, पण त्याला ते माहित नाही, तो भोळा आहे. असे हा भामटा वृद्धेस म्हणाला. त्यानंतर त्या व्यक्तीने बोलण्यात गुंतवून वृद्धेला तिच्या गळ्यातील सोनसाखळी काढून देण्यास सांगितले. तसेच या सोनसाखळीचे बाजारभावापेक्षा जास्त पैसे देऊ अशा बतावणी केली. वृद्धा अमिषाला बळी पडल्याने तिने गळ्यातील सोनसाखळी दिली. तो व्यक्ती पुढे जात असताना अचानक वृद्धेने पुन्हा सोनसाखळी मागितली.
त्यावेळेस भामट्याने वृद्धेला रुमाल देऊन त्यामध्ये सोनसाखळी असल्याचे सांगितले. वृद्धेने रूमाल उघडले असता, त्यामध्ये माती दिसली. तो पर्यंत भामटा पळून गेला होता. तसेच तिकीट मागणारा मुलगापण गायब झाला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.