लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : बाळकुम येथे ठाणे महापालिकेने ऑलिम्पिक दर्जाचे तरण तलाव तयार केले आहे. या तरण तलावाच्या लोकार्पणास दोन वर्ष उलटले असतानाही तो अद्यापही नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत असून संताप व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा-डोंबिवली-ठाणे प्रवाशांचा लोकलला लोंबकळत प्रवास
बाळकुम परिसरातील राममारुती नगर येथे ठाणे महापालिकेने २७ कोटी रुपये खर्चून ऑलिम्पिक दर्जाचा धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव उभारला आहे. या तरण तलावाचे दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण केले होते. अद्यापही हा तरण तलाव बंदच असून प्रत्यक्षात तरण तलावाचा वापर झालेला नाही. ऐन दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलांना आणि जलतरणपटुंना तलाव उपलब्ध नसल्याने काही नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार बुधवारी आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक घेऊन संबधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत तरण तलाव युद्धपातळीवर खुला करण्याचे निर्देश दिले. धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिलेल्या या तरण तलावाकडे ठाणे महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे दुर्लक्ष होत आहे. तलावाची कामे पूर्ण झाली नसल्याचे पालुपद लावत केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. आता पुन्हा कामांच्या निविदांचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे या तलावाला मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न केळकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला.