शतप्रतिशतसाठी त्यांना ४० जागांचा प्रस्ताव, तर जुन्यांना उर्वरित जागा; लवकरच निर्णय

कलंकित नेत्यांना पायघडय़ा घालत पक्षप्रवेश देण्याचा शिरस्ता भाजप उल्हासनगरातही कायम ठेवेल असे चित्र दिसू लागले असून वादग्रस्त नेते पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी यांच्या पक्षप्रवेशाची जंगी तयारी करत भाजप नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यासोबतच्या वाटाघाटींचा वेग वाढविला आहे. महापालिकेतील ७८ जागांपैकी ओमी यांनी ४० जागांवर दावा केला आहे.

ही बोलणी पूर्ण होताच  ओमी भाजपमध्ये विलीन होईल, असा दावा केला जात असून येत्या २४ तासांत यासंबंधीच्या घडामोडी अधिक वेगाने होतील, अशी शक्यता आहे.

राज्यातील इतर महापालिकांमधील शिवसेनेसोबत असलेली युती तुटताच उल्हासनगरातही शिवसेनेला अंगावर घेतल्याशिवाय भाजपला पर्याय नाही. उल्हासनगरातील राजकीय समीकरणे पाहाता या ठिकाणी कलानी कुटुंबीयांच्या वर्चस्वास तोंड देताना आतापर्यंत भाजपला सातत्याने शिवसेनेची साथ उपयोगी ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची हवा असतानाही भाजपचा उल्हासनगरात कलानी यांच्याकडून पराभव झाला होता.

जागांवरून रस्सीखेच

ओमी यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी वाटाघाटींना जोर आला असून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण सोमवारपासून उल्हासनगरात तळ ठोकून असल्याची चर्चा आहे. ओमी आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींनुसार ओमी यांनी ७८ पैकी ४० जागांवर दावा सांगितला आहे. ओमी यांच्या समर्थकांमध्ये २२ नगरसेवकांचा समावेश असून या सर्वाना भाजपमधून उमेदवारीची हमी हवी आहे. याशिवाय अन्य १८ समर्थकांसाठी ओमी यांनी विविध भागांमधून उमेदवारी मागितली आहे. काही जागा या भाजपच्या विद्यमान नगरसेवकांच्या कोटय़ातील आहेत. त्यापैकी आठ जागांवरून ओमी आणि भाजपमधील चर्चेची फेरी पूर्ण होऊ शकलेली नाही, असा दावा विश्वसनीय सूत्रांनी केला.

Story img Loader