दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहारातून गेल्या बुधवारी डोंबिवलीत आलेल्या एका रहिवाशाला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याला कल्याणमधील पालिकेच्या लालचौकी आर्ट गॅलरी येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. तसेच या व्यक्तीला ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा संसर्ग तर झाला नाही ना?, यासंदर्भातील चाचण्याही केल्या जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेय. दरम्यान ही व्यक्ती नवी दिल्ली मार्गे दक्षिण आफ्रिकेवरुन मुंबईत आल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रवासादरम्यान नक्की काय घडलं याचा तपशीलही समोर आलाय.
केपटाऊन-दुबई-दिल्ली आणि मुंबई असा प्रवास करत हा रहिवासी डोंबिवलीत आला. प्रवासात या प्रवाशाला ताप आल्याचे जाणवले. त्याने दिल्लीत विमानतळावर उतरल्यावर करोना चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली. त्याने घरी संपर्क करुन घरात कोणीही थांबू नका. मी एकटाच घरात राहणार असल्याचे कुटुंबियांना कळविले. बुधवारी हा प्रवासी डोंबिवलीत आला.
नक्की वाचा >> ‘ओमिक्रॉन’बद्दल उगाच भीती निर्माण केली जातेय?; पहिल्यांदा इशारा देणाऱ्या दक्षिण आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणतात, “अनेक रुग्ण तर…”
जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट
डोंबिवलीमध्ये परतल्यानंतर या वय्क्तीने पुन्हा पालिकेच्या करोना चाचणी केंद्रात चाचणी केली. ती सकारात्मक आली. हा प्रवासी द. आफ्रिकेतून आला असल्याने तातडीने पालिकेच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या घर परिसराचे निर्जंतुकीकरण केले. या रहिवाशाची पालिकेच्या कल्याणमधील संस्थात्मक विलगीकरणात रवानगी केली. हा रुग्ण स्थिर आहे. या रुग्णाची जनुकीय गुणसूत्र चाचणी म्हणजेच जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्याचे नियोजन केले आहे. पानपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत आफ्रिकेतून आलेलल्या करोनाबाधित रुग्णाचे अहवाल जनुकीय गुणसूत्र तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. यासंदर्बातील अहवाल सात दिवसांमध्ये मिळेल. तो पर्यंत या रुग्णावर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं लक्ष असणार आहे. त्याच्या उपचारांसंदर्भातील सर्व माहिती आणि तपशील वेळोवेळी पालिका कर्मचाऱ्यांकडून तपासला जाईल असं यामधून स्पष्ट होत आहे.
सात दिवस पूर्ण झाले…
आफ्रिकेतून येऊन या रुग्णाला सात दिवस पूर्ण होत आले आहेत. त्यानंतर ही त्यांची जनुकीय गुणसूत्र चाचणी, करोना चाचणी केली जाईल, असे साथ रोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
नातेवाईकांचीही चाचणी करण्यात आली
या रुग्णाला पालिकेच्या पूर्ण नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णाच्या नातेवाईकाची पण करोना चाचणी केली. ती नकारात्मक आली आहे. आफ्रिकेसह करोना रुग्णांची संख्या अधिक असलेल्या परदेशातून शहरात येणाऱ्या प्रवाशांवर शासन नियमानुसार लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे, असे डाॅ. पानपाटील यांनी सांगितले.
कॅनडामध्ये आढळला ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण
कॅनडामध्ये या नवीन प्रकारच्या करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. असोसिएट फ्री प्रेसच्या सौजन्याने देण्यात आलेल्या वृत्तानुसार नायझेरियामधून कॅनडामध्ये आलेल्या दोन जणांना या नवीन विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
यापूर्वी हा विषाणू बोस्वाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँग या देशांमध्ये आढळून आलेला.