आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. असं असतानाच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डोंबिवलीमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका रहिवाशाला करोनाचा लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडालीय. ‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट ज्या देशांमध्ये पसरलाय त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतच असल्याने या प्रवाशाला या नवीन प्रकारच्या घातक करोनाची लागण झालेली नाही ना याची सध्या खातरजमा करुन घेतली जात आहे.

नक्की वाचा >> ताप आला, कुटुंबाला फोन केला अन्… ‘ती’ व्यक्ती आफ्रिकेमधून डोंबिवलीत येईपर्यंत काय काय घडलं?

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून गेल्या बुधवारी डोंबिवलीत आलेल्या एका रहिवाशाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली. तसेच या व्यक्तीला झालेल्या करोनाचा संसर्ग हा नव्या प्रकारच्या “ओमिक्रॉन’ व्हेरिएंटचा तर नाही ना याची तपासणी करण्यासाठी जिनोम सिवेन्सिंग चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आल्याचेही पानपाटील यांनी स्पष्ट केलं आहे. पानपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत आफ्रिकेतून आलेलल्या करोनाबाधित रुग्णाचे अहवाल जनुकीय गुणसूत्र तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. यासंदर्बातील अहवाल सात दिवसांमध्ये मिळेल. तो पर्यंत या रुग्णावर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं लक्ष असणार आहे. त्याच्या उपचारांसंदर्भातील सर्व माहिती आणि तपशील वेळोवेळी पालिका कर्मचाऱ्यांकडून तपासला जाईल असं यामधून स्पष्ट होत आहे.

डोंबिवलीमधील संबंधित करोना पॉझिटिव्ह व्यक्ती दक्षिण आफ्रिकेवरुन दिल्ली आणि नंतर दिल्लीवरुन मुंबईला आली होती, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आङे. त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या भावाची करोना चाचणी नकारात्मक आली आहे. तर इतर कुटुंबियांची करोना चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही. आज म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२१ रोजी या व्यक्तीच्या निकटवर्तीयांची आणि कुटुंबियांची करोना चाचणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> ‘ओमिक्रॉन’बद्दल उगाच भीती निर्माण केली जातेय?; पहिल्यांदा इशारा देणाऱ्या दक्षिण आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणतात, “अनेक रुग्ण तर…”

दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीबाबत फेरविचार करण्यात येत असल्याचेही केंद्राने रविवारी स्पष्ट केले. जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ विषाणूच्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्क केले. ‘ओमिक्रॉन’च्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी करोना चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या, प्रवाशांची इतिहासनोंद, करोना नियमावलीचे कठोर पालन, अशी चारस्तरीय उपाययोजना लागू करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्रासह विविध राज्यांनी प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.

कॅनडामध्ये आढळला ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण
कॅनडामध्ये या नवीन प्रकारच्या करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. असोसिएट फ्री प्रेसच्या सौजन्याने देण्यात आलेल्या वृत्तानुसार नायझेरियामधून कॅनडामध्ये आलेल्या दोन जणांना या नवीन विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

यापूर्वी हा विषाणू बोस्वाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँग या देशांमध्ये आढळून आलेला.