ओंकार श्री गणेश सोसायटी,नायगाव पूर्व

नायगाव पूर्वेला असलेल्या प्रेरणानगरमधील ‘ओंकार श्री गणेश सोसायटी’ म्हणजे एकोप्याचे दुसरे नाव असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ६० सदनिका असलेल्या या सोसायटीमध्ये सर्व धर्म एकोप्याने व सुखाने नांदत आहेत.

‘ओंकार श्री गणेश सोसायटी’ गेल्या २० वर्षांपासून नायगाव पूर्वेला उभी आहे. सोसायटीमध्ये १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय उत्सव साजरे केले जातात. येथील मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सोसायटीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढे जाण्यासाठी सोसायटी मदत करते. या सोसायटीमध्ये सर्व धर्माचे सण मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. त्या प्रत्येक सणाचे महत्त्व नव्या पिढीला कळावे म्हणून खास प्रयत्न केले जातात. दिवाळी, ख्रिसमस, गुढीपाडवा, दहीहंडी या सणांना सर्वजण एकत्र येतात. होळीला आनंदाने रंग उधळले जातात. या वेळी रहिवाशांकडून सामाजिक बांधिलकी जपली जाते, तर लहान मुलांसाठी खेळांचे आयोजन केले जाते.

या सोसायटीचे चेअरमन संदीप पंडित, तर सेक्रेटरी इब्रार सिद्धिकी आहेत. खजिनदारपदी जितेंद्र वायंगणकर आणि मॅनेजर शशिकांत देसाई आहेत. स्वच्छतेचा नारा इथे प्रत्यक्षात अमलात आणला जात आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. एवढेच नव्हे तर संकुलातील सर्व मिळून येथे स्वच्छता अभियानदेखील राबवतात. इमारतीच्या बाजूचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी सध्या पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. आता सोसायटी पर्यावरणाच्या दृष्टीने कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे ध्येय बाळगून असून याबाबतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे संदीप पंडित यांनी सांगितले. तसेच इमारतीवर सोलर सिस्टीम बसून विजेची बचत करण्याचे धोरण राबिण्याचे सोसायटीने ठरविले आहे. ते लवकरच अमलात आणले जाईल.

इमारतीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणत वृक्षलागवड करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वेली, छोटे वृक्ष आणि फुलझाडांच्या कुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. हिरवाईची ओढ फक्त इथेच संपत नसून प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की, इमारतीच्या आवारात सभोवताली विविध वृक्ष बहरलेले दिसतात. सणसमारंभात पर्यावरणविषयक जागृती करण्यात येते. जलबचतीचे धडे दिले जातात. याशिवाय वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात येते. आरोग्याच्या दृष्टीने सोसायटीत कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. दिवाळीत येथे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात.

तंटामुक्त सोसायटी

हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असे विविध धर्मीय या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहत आहेत. सर्वधर्मसमभाव ही या संकुलातील संस्कृती आहे. सर्वाच्या सुखदु:खात सहभागी होण्यासाठी इथे प्रत्येक रहिवासी तयार असतो. भिन्नधर्मीय कुटुंबे तरीही त्यांच्या बोलण्याचालण्यात एक सहजपणा दिसून येतो. रहिवाशांनी सोसायटीत कधीही तंटा न झाल्याचे सांगितले. यासाठीच आमचा नावलौकिक आहे. एकी हीच आमची ओळख आहे, असेही ते म्हणाले. सोसायटीमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र उद्यानाची सोय आहे. प्रत्येकासाठी स्वतंत्र पार्किंगची सोय आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या आवारात सायंकाळच्या वेळी येथे बसून निसर्गाच्या सान्निध्यात आपला वेळ घालवतात. त्या ठिकाणी अनेक गप्पागोष्टीही रंगतात.

Story img Loader