ठाणे : महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्वाचा स्त्रोत असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कळवा, मुंब्रा, दिवा आणि ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी चोवीस तास बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. आधीच या भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली असून पाणी बंदमुळे ती आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून १२० दशलक्ष लीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

हेही वाचा…डोंबिवलीत पती-पत्नीला तलवारीचा धाक दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न

यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा १३५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठ्याचे नियोजन कळवा, मुंब्रा, दिवा आणि ठाण्याच्या काही भागात करण्यात येतो. या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असून काही दिवसांपुर्वी मुंब्य्रातील नागरिकांनी पाणी टंचाईविरोधात आंदोलन केले. असे असतानाच, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे या भागांचा पाणी पुरवठा गुरुवार, २७ जुन रोजी रात्री १२ ते शुक्रवार, २८ जुन रोजी रात्री १२ या कालावधीत चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता), कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये आणि वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणी पुरवठा बंद राहील.