लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: सुशोभिकरण उपक्रमांतर्गत रस्त्यालगत पडलेला राडारोडा उचलण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी काही दिवसांपुर्वी दिले असले तरी त्याकडे पालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. बाळकुम भागातील रस्त्यालगत असलेले राडारोड्याचे ढिग गेल्या महिनाभरापासून उचलण्यात आलेले नसून त्यातच येथील रस्त्यावरच डम्परच्या साहय्याने राडारोडा टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे हा परिसर राडारोडा क्षेपणभुमी तयार होऊ लागल्याचे चित्र असतानाच, रस्त्याच्या मधोमध असलेल्या ढिगांमुळे वाहन धडकून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. तसेच या प्रकारांमुळे शहर सौंदर्यीकरणाला बाधा निर्माण होत आहे.

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी रंगरंगोटीच्या माध्यमातून सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत. त्यात शहरातील प्रमुख रस्त्यांवरील उड्डाणपुल, अंतर्गत रस्त्यालगतच्या भिंती, तलाव परिसर तसेच अन्य भागामध्ये विविध संकल्पनेवर आधारित चित्र काढण्यात येत आहेत. या रंगरंगोटीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत असतानाच दुसरीकडे रस्त्यालगत राडारोडा फेकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रकारांमुळे शहर सौंदर्यीकरणाला बाधा निर्माण होत आहे. ही बाब निदर्शनास येताच ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पाऊले उचलली होती. यासंदर्भात आयुक्त बांगर यांनी एक बैठक घेऊन त्यात संबंधित विभागाला महत्वाच्या सुचना केल्या होत्या.

आणखी वाचा- कल्याण-डोंबिवलीत विजेच्या लपंडावाने रहिवासी हैराण

शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा उचलण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर विशेष पथके तयार करण्यात यावी. या पथकाच्या माध्यमातून सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत दोन पाळीमध्ये शहरभर गाड्या फिरत राहतील आणि त्यांच्यामार्फत राडारोडा उचलला जाईल याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश त्यांनी बैठकीत दिले होते. या आदेशानंतरही भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील बाळकुम भागातील रस्त्याक़डेला राडारोड्याचे मोठे ढिग दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून याठिकाणी हे ढिग कायम असतानाच, याठिकाणी आता राडारोडा टाकण्याचे ढिग वाढू लागले आहे. त्यामुळे हा परिसर राडारोडा क्षेपणभुमी तयार होऊ लागल्याचे चित्र आहे.

Story img Loader