ठाणे – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये मागील काही महिन्यांपासून वारंवार अनेक वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असतानाचा आता शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांच्या वतीने कोपरी – पाचपाखाडी या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच एका अनोख्या निबंध आणि व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजक करण्यात आले आहे. ‘आदेश मोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी कोणती शिक्षा दिली असती’ , मे, २०१४ ते मार्च, २०२३ पर्यंतचे अच्छे दिन यांसारखे मार्मिक आणि अनोखे विषय असल्याने या स्पर्धेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये शाखा ताब्यात घेणे, एकमेकांविरोधात आक्षपार्ह विधान करणे यांसारख्या गोष्टींवरून मागील सहा ते सात महिन्यांपासून अनेक वाद विवादाच्या घटना झाल्याचे समोर आले आहेत. तसेच दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींकडूनही आंदोलने, जाहीरसभा, पक्षाचे कार्यक्रम यांतून परस्परविरोधी घोषणाबाजी, टीकात्मक वक्तव्य केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर यांच्या वतीने कोपरी – पाचपाखाडी या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच एका अनोख्या निबंध आणि व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिवसप्ताह कार्यक्रमांतर्गत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यातील दोन्ही स्पर्धांचे विषय हे अत्यंत मार्मिक स्वरुपाचे असल्याने ठाणे शहरात या स्पर्धेची चांगलीच चर्चा रंगली आहे. तर ही स्पर्धा १४ वर्षांपुढील सर्वांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
मार्मिक विषयांची रंगतेय चर्चा
संजय घाडीगावकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत निबंध लेखनासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब व बाळासाहेबांचा आदेश आणि शिवसेना, मे २०१४ ते मार्च २०२३ पर्यंतचे अच्छे दिन हे विषय देण्यात आले आहे. तर व्यंगचित्र स्पर्धेसाठी बाळासाहेबांनी दिलेला शेवटचा आदेश मोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी कोणती शिक्षा दिली असती? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काल आज आणि उद्या, शिव पर्व, फितुरी आणि मराठी माणूस यांसारखे विषय देण्यात आले आहेत. तर यातील विजेत्या स्पर्धकांना ११ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत रोख रकमेचे पारितोषिकही देण्यात येणार आहे.