ठाणे : शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी ११७ वाहनांची खरेदी झाली असल्याची नोंद ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. यामध्ये कार, दुचाकी, मिनी टेम्पो आणि ट्रॅक्टरचा समावेश आहे. चारचाकी वाहन खरेदीला ग्राहकांनी यंदा सर्वाधिक पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. तर, २३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत तब्बल ३ हजार १६० ग्राहकांनी वाहन खरेदी केल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा गुढी पाडव्याचा मूहुर्त असतो. यादिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे म्हणजे शुभ मानले जाते. त्यामुळे यादिवशी अनेकजण दागिने, वाहन आणि घर खरेदीला पसंती देतात. यंदाही ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात गुढीपाडव्यानिमित्त वाहन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांनी काही दिवसांपूर्वीच आगाऊ नोंदणी केली होती. तर, गुढीपाडव्याच्या दिवशी देखील सकाळ पासून वाहनांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून आली होती. २३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३ हजार १६० नवीन वाहनांची नोंद करण्यात आली. यामध्ये १ हजार ४४० दुचाकी तर, १ हजार ५६ चारचाकी वाहनांची संख्या आहे. यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी ११७ वाहनांची खरेदी झाली असल्याची नोंद ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत चारचाकी वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ झाली असून नागरिकांनी स्वतःसाठी आणि व्यावसायिक कारणांसाठी नवी वाहने खरेदी करण्यास प्राधान्य दिले. गेल्या काही वर्षांत वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ झाली असून इंधनावर चालणाऱ्या वाहनांसोबतच इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन खरेदी
दुचाकी – ४२
चारचाकी – ५७
ट्रॅक्टर – १
मालवाहू गाड्या – १७
एकूण – ११७