ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या हातावर जोर-जोरात फटके मारून त्या प्रवाशाच्या हातातील आयफोन कंपनीचा मोबाईल दोन चोरट्यांनी खेचून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण येथील आधारवाडी कारागृह रोड परिसरात ४६ वर्षीय व्यक्ती राहतात. ते एका खासगी कंपनीत कामाला असून त्यांच्या कंपनीने त्यांना ॲपल कंपनीचा ‘आयफोन – १२’ हा मोबाईल कंपनी कामाच्या वापरासाठी दिला होता. त्यामुळे या मोबाईलचा ते नेहमी वापर करत होते. ११ एप्रिलला ते ठाण्याहून कल्याणला त्यांच्या घरी जाण्यासाठी ‘ओला’ रिक्षाने निघाले होते.
मुंबई नाशिक महामार्गावर रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास ते रिक्षाने पोहचले. रिक्षा कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली असता, त्यांच्या मोबाईलवर एक मेल आला. त्यामुळे त्यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढला. मोबाईलवर ते मेल पाहत असताना, अचानक रिक्षा मागून एका दुचाकीवर दोन चोरटे आले. यातील एक चोरटा दुचाकी चालवित होता. तर दुसरा चोरटा त्याच्या मागे बसला होता. रिक्षामधील प्रवासी मोबाईल पाहत असल्याचे त्यांना दिसल्यानंतर दुचाकीच्या मागे बसलेल्या चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला.
परंतु प्रवाशाने त्याला विरोध करत मोबाईल हातामध्ये घट्ट पकडून ठेवला होता. परंतु चोरट्याने त्यांच्या हातावर जोर-जोरात फटके मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रवाशाची मोबाईलवरील पकड सैल झाली. त्यानंतर चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. प्रवासी आणि रिक्षा चालकाने त्यांचा रांजनोली नाका पर्यंत शोध घेतला. पंरतु दोघेही चोरटे फरार झाले होते. अखेर प्रवाशाने कोनगाव पोलीस ठाणे गाठले. प्रवाशाने कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महामार्गावर चोरट्यांचा उच्छाद
यापूर्वीही मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रूतगती महामार्गावर मोबाईल हिसकाविण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका कलाकाराचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेत कलाकार रिक्षानेच प्रवास करत होता. त्याच्या हातून देखील चोरट्यांनी अशाच प्रकारे मोबाईल खेचला होता. यात त्यांच्या हाताला देखील दुखापत झाली होती. त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावेळी आणखी एका तरुणाचा देखील अशाच प्रकारे मोबाईल खेचून नेल्याचे समोर आले आहोते. त्यामुळे महामार्गावर चोरट्यांचा उच्छाद सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.