कल्याण : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, ठाणे जिल्ह्यातील शहापूर ते आमणे (भिवंडी) या शेवटच्या ७५ किलोमीटरच्या टप्प्यातील कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. शहापूर शेरे-आमणे रस्त्यावरील बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच ही कामे पूर्ण करून हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचा राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न आहे.
इगतपुरी-शहापूर, आमणे या शेवटच्या टप्प्यातील कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे एमएसआरडीसीचे प्रयत्न होते. परंतु काही तांत्रिक, स्थापत्य कामांमुळे रस्त्यामधील काही कामे वेळेत पूर्ण न झाल्याने हा रस्ता विधानसभा निवडणुकीपूर्वी खुला करता आला नव्हता. शहापूर, कल्याण, आमणे मुख्य रस्त्यावरील बहुतांशी कामे आता पूर्ण करण्यात आली आहेत. काही किरकोळ कामांवर शेवटचा हात फिरवला जात आहे, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या एका अधिकाऱ्याने दिली.
हे ही वाचा… कल्याण पूर्वेत रस्तोरस्तीच्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी
इगतपुरी, कसारा घाट परिसर, भातसा धरणाखालील उड्डाण पूल, शहापूर शेलवली-शेरे, कोळकेवाडी गावाजवळील उड्डाण पुलाचे कामे पूर्ण करण्यात आले आहे. कल्याण तालुक्यातील फळेगाव परिसरातील समृध्दी महामार्गावरील टोल नाक्याची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. समृध्दी महामार्गाचा मुंबई, ठाण्याच्या वेशीवरील शेवटचा टप्पा भिवंडी जवळील आमणे येथे संपतो. याठिकाणची अंतिम टप्प्यातील कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. समृध्दी महामार्गाचा आमणे येथील टप्पा मुंबई-वडोदरा महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शांग्रीला रिसाॅर्ट ते भिवंडी पोहच रस्त्याचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे. शहापूर शेरे ते आमणे रस्त्यावर समृध्दी महामार्गावर डाव्या बाजुला पनवेल-जेएनपीटी येथे जाण्यासाठी पोहच रस्ता देण्यात येणार आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यातील औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्र जोडण्याची कामे या महामार्गाच्या माध्यमातून केली जात आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने दिली.
स्थानिकांचा झटपट प्रवास
समृध्दी महामार्गाची इगतपुरी ते आमणे या ७५ किलोमीटरच्या टप्प्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. समृध्दी महामार्गावरील काही किरकोळ कामे जागोजागी सुरू आहेत. महामार्ग कामांसाठीची वाहने समृध्दीवरून धावतात. या रस्त्यांवरून स्थानिक रहिवासी शहापूर शेरे-शेलवली गावाजवळून कल्याण, आमणे भिवंडीपर्यंतचा प्रवास, येथूनच सरळांबे, इगतपुरी पर्यंतचा प्रवास विनाव्यत्य करतात. शहापूर शेरे येथून आमणे येथे येण्यासाठी अर्धा तासाचा कालावधी लागतो. हाच प्रवास मुंबई -नाशिक महामार्ग, पडघे, आमणे असा करताना एक तास लागतो, असे प्रवाशांनी सांगितले.
हे ही वाचा… ठाणे जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी वाहतूक बद्ल
या महामार्गावरून कामे सुरू असल्याने रिक्षा चालक, मोटारी, दुचाकी स्वार झटपट प्रवास करत आहेत. सुखकर प्रवास होत असल्याने स्थानिक प्रवासी, वाहन चालक समाधान व्यक्त करत आहेत.
शहापूरहून कल्याणमध्ये येण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गाने एक तास लागतो. हाच प्रवास शहापूरहून शेरेगावाजवळून समृध्दी महामार्गाने एक तासात पूर्ण होतो. समृध्दीच्या मजबुत, रस्ता पृष्ठभागावरील लवचिकतेमुळे वाहने या रस्त्यावरून सुसाट धावतात. – जगदीश म्हात्रे, वाहन चालक, डोंबिवली.