विरार रेल्वे पोलीस विशेष मोहीम राबवून कारवाई करणार
लोकल ट्रेनच्या दारात उभे राहून जागा अडविणे, इतर प्रवाशांना चढू न देणे याचबरोबर आता रुमाल टाकून जागा अडविण्याचे प्रकारही लोकलमध्ये वाढू लागले आहेत. त्याच्या अनेक तक्रारी रेल्वे पोलिसांकडे येत आहेत. अशा जागा पकडणाऱ्यांच्या विरोधात रेल्वे पोलिसांनी पुन्हा विशेष मोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे.
विरार लोकलमधून दररोज लाखो प्रवासी मुंबईला प्रवास करत असतात. मात्र जागा अडविण्याचे प्रकार वारंवार होत असतात. यामुळे मागील काही महिन्यांत प्रवाशांमध्ये अनेक वाद होत असून बरेच वेळा या वादाला हिंसक वळण येत असल्याने मारामारीच्या घटनाही घडल्या होत्या. आता पुन्हा अशा सीट माफियांचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.
विरारहून चर्चगेटच्या दिशेने पहाटे सुटणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये काही प्रवासी आपल्या सहकाऱ्यांसाठी चक्क सीटवर रुमाल, बॅग, किंवा पाण्याच्या बाटल्या ठेवून जागा अडवून बसतात. त्यामुळे सामान्य प्रवासी आणि गटातील प्रवासी यांच्यात जागेवरून वाद वाढत आहेत.
रुमाल टोळीची दहशत
विरारमध्ये सध्या जागा मिळवण्यासाठी रुमाल टोळीची दहशत बघायला मिळत आहे. अनेक प्रवाशांचे गट नालासोपाराहून उलटे प्रवास करून विरारला येतात. ते स्वत: जागा अडवतातच, परंतु रुमाल, पाण्याची बाटली आणि बॅगा ठेवून आपल्या सहकाऱ्यांसाठीही जागा अडवत असतात. त्यामुळे विरार स्थानकात गाडीमध्ये चढूनदेखील ग्रुपवाल्या प्रवाशांच्या मुजोरीमुळे बसण्यासाठी जागा असूनही सामान्य प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
जागा अडवून बसणाऱ्यांबाबत आमच्याकडे अशा तक्रारी आल्या आहेत. आम्ही जागा अडविणाऱ्या आणि दादागिरी करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करतच असतो. वाढत्या तक्रारीमुळे विशेष मोहीम घेऊन अशा प्रवाशांवर कारवाई केली जाईल.
-विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस