ठाण्यात कार्यक्रमाचे आयोजन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य शासनाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्ताने राज्यातील १०६ शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री विनोद तावडे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये ३७ प्राथमिक शिक्षक, ३८ माध्यमिक शिक्षक, १८ आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक, २ कला शिक्षक, २ स्काऊट-गाईड, १ विशेष शिक्षकांना तसेच ८ महिला शिक्षिकांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.पुरस्कारप्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि १० हजारांची रोख देण्यात येणार आहे. गेल्या वर्षीपासून शिक्षकांना पीसी टॅब देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार शिक्षकांना टॅबचे वितरण केले जाणार आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता राज्यातील निवड झालेल्या १०६ शिक्षकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे, ठाण्याचे महापौर संजय मोरे आणि ठाण्यातील लोकप्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. राज्याचे शिक्षण संचालक नामदेव जरग यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
पुरस्कारप्राप्त ठाणेकर शिक्षक
राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारामध्ये ठाणे जिल्ह्य़ातील शिक्षकांचा समावेश आहे. त्यामध्ये प्राथमिक विभागात उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वामी सर्वानंद विद्यालयाचे साहाय्यक शिक्षक मुक्ता कमलदास यांची निवड झाली आहे. माध्यमिक शिक्षकांमध्ये महागिरी येथील अंजुमन खैरूल इस्लाम उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक शेख सिकंदर, आदिवासी विभागातील डहाणूतील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक स्मिता पागधरे आणि मुरबाडच्या टोकावडे जि. प. शाळेच्या सहायक शिक्षक भागवत पवार यांची निवड करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On teachers day glory to 106 teachers in the state