डोंबिवली : ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान नेहमीप्रमाणे आपल्या मैत्रिणी सोबत फिरण्यासाठी आलेल्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज दुचाकीवरून आलेल्या दोन भुरट्या चोरांनी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात या लूटप्रकरणी महिलेने तक्रार केली आहे.

प्रिया सुतार या आपल्या कुटुंबीयासोबत खंबाळपाडा भागात राहतात. त्या आपल्या मैत्रीण रुपा नायर यांच्या सोबत सकाळच्या वेळेत ९० फुटी रस्त्यावर फिरण्यासाठी येतात. प्रिया सुतार यांनी रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मी आणि माझी मैत्रीण रूपा नायर ९० फुटी रस्त्यावर फिरण्यासाठी जात होतो. दावत हाॅटेलकडून म्हसोबा चौक दिशेने पायी जात असताना पाठीमागून एक दुचाकी आली. ही दुचाकी पुढे निघून जाईल असे वाटले असतानाच, दुचाकी स्वार एकदम आमच्या अंगावर आला.

दुचाकी अंगावर आली म्हणून आम्ही थोडे बाजुला झालो. तेवढ्यात मला काही कळण्याच्या आत माझे मानेवर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने जोरदार फटका मारला. त्याने गळ्यातील सोन्याचे १२ ग्रॅम वजनाचे चाळीस हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मानेला जोराचा मंगळसूत्राचा हिसका बसल्याने थोडी जखम झाली. आपण मानेला हात लावल्यानंतर आपल्या गळ्यात मंंगळसूत्र नसल्याचे ते दुचाकीवरून दोन्ही इसमांनी लुटून नेल्याचे समजल्यावर आम्ही ओरडा केला, तोपर्यंत भुरटे चोर म्हसोबा चौक ९० फुटी रस्त्याने पळून गेले होते. दोन्ही इसम २५ ते ३० वयोगटातील होते.

मानेला जखम झाली असल्याने पोलीसांच्या सूचनेप्रमाणे आपण शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर आपल्या जवळील सोन्याच्या ऐवजी लूट करण्यात आल्याने पूजा सुतार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून या चोरी प्रकरणातील भुरट्या चोरांचा शोध सुरू केला आहे.

Story img Loader