लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील पाचपाखाडी भागात सोमवारी सकाळी मोटारीचे चाक पंक्चर होऊन चालकाचा ताबा सुटून रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला मोटार धडकली. या धडकेत पाच प्रवासी गंभीर जखमी झाली असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

फय्याज शेख (५१), विकास कुमार (२१), शिवशंकर विक्रम आदित्य (३३), संतोष कुमार (२४) आणि प्रदीप प्रसाद (२५) अशी जखमींची नावे आहेत. यातील संतोष आणि विकास यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आणखी वाचा-ठाणे : कीर्तन महोत्सवासाठी मलंगगड भागात विशेष वाहनतळांची व्यवस्था

मुंबई नाशिक महामार्गावरून सोमवारी सकाळी टाटा सुमो ही मोटार ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत होती. मोटारीमध्ये फय्याज हा वाहन चालवित होता. तर उर्वरित त्याच्यासोबत प्रवास करत होते. सकाळी ७ वाजताच्या सुमारास मोटार पाचपाखाडी भागात आली असता, मोटारीचे मागील चाक पंक्चर झाले आणि फय्याजचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे त्यांची मोटार रस्त्याकडेला विटांनी भरलेल्या एका टेम्पोला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the first day of the new year there was terrible accident on the mumbai nashik highway mrj
Show comments