लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: दिवा भागातील पाणी पुरवठ्यात वाढ करत नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी या भागात पाणी टंचाईची समस्या कायम असल्याची बाब समोर आली आहे. पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी महापालिकेच्या निषेधार्थ मडके फोडो आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच टँकरलॉबी चालावी म्हणून काही स्थानिक शिवसेना नेत्यांकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित करत ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईला पालिका प्रशासन आणि मनमानी करणारे शिवसेनेचे स्थानिक नेते जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. त्यास शिवसेनेनेही प्रतिउत्तर देत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टिका केली आहे. यानिमित्ताने दिव्यात शिवसेना आणि भाजप मित्र पक्षाच्या स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
दिवा भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागात पाणी टंचाईची निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी येथील पाणी पुरवठ्यात वाढ करण्याबरोबरच मुख्य जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आली. दोन महिन्यांपुर्वी नव्याने टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहीनीचे लोकापर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यानंतर येथील पाणी टंचाईची समस्या कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र याठिकाणी पाणी टंचाईची समस्या आजही कायम असल्याची बाब समोर आली आहे. याचमुद्द्यावरून भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी पालिका प्रशासनासह शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर टिका केली आहे.
हेही वाचा… डोंबिवलीत खचलेल्या रस्त्यामधून प्रवाशांचा प्रवास
दिवा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्य जलवाहिनीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पणानंतरच शहरातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये दोन ते तीन दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. काही भागांना पाणीही मिळत नाही. भर पावसात दिव्यात टँकरद्वारे नागरिकांना पाणी घ्यावे लागते. टँकर लॉबी चालावी म्हणून दिव्यातील काही स्थानिक शिवसेना नेत्यांकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात आहे का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला आहे. दिवा शहरातील नागरिकांना पाणी देयके भरूनही पाणी मिळत नाही. भर पावसात दिवा शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, असा दावाही त्यांनी केली आहे. नागरिकांचा प्रत्येक सुट्टीचा रविवार हा पाणी वाहिन्या तपासणी करणे आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जातो. पावसाळ्यात अशी परिस्थिती असेल तर अन्य दिवसात येथील नागरिकांना किती यातना होत असतील असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर टिका
पालिका प्रशासन ज्यांच्या इशाऱ्यावर चालते, त्यांना दिव्यातील जनतेच्या पाणी प्रश्नाशी काही घेणेदेणे नाही. नागरिकांनी फक्त यांच्या बंगल्यांवर हजेरी लावायची आणि पाण्यासाठी याचना करायची अशीच यांची भावना आहे. नागरिकांना पाणी दिल्यास नागरिक पुन्हा आपल्या बंगल्यावर येणार नाहीत, या हेतूने येथील तथाकथित कार्यसम्राट नेते दिव्यातील पाणी प्रश्न सोडवत नाहीत, असा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे. महापालिका प्रशासन दिव्यातील पाणी समस्या सोडवण्यात पूर्णतः अपयशी ठरले असून या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर मडके फोडो आंदोलन करणार येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवसेनेचे प्रतिउत्तर
दिवा, साबे या परिसरात पाण्याचा दाब वाढला आहे. बीआरनगर, बेडेकरनगर भागातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात आहे. मुंब्रा देवी भागात जलवाहीन्या टाकण्याची कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे कुणाला उत्तर देण्यापेक्षा आम्ही आमचे काम करीत आहोत. त्यांच्याकडून कामे होत नाहीत म्हणून लोक त्यांच्याकडे जात नाहीत. लोक आमच्याकडे येत आहेत,याचे त्यांना दु:ख होत आहे. ते स्वत:लाच निष्क्रीय ठरवित असल्याने त्यात त्यांच्या पक्षाचे नेते आणि आम्ही काय करू शकतो. – रमाकांत मढवी, दिवा शहरप्रमुख, शिवसेना