ठाणे : अजून बऱ्याचजणांच्या विकेट काढायच्या आहेत, असे सुचक विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केले. लोकांमध्ये गेल्याशिवाय त्यांचे प्रश्न कळत नाहीत. त्यामुळेच लोकांमध्ये जाऊन काम करतोय, असे सांगत घरात आणि कार्यालयात बसून सरकार चालविता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्ताने ठाण्यातील आनंद आश्रम येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यानंतर झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री आणि नागरिक हे वेगळे आहेत, असे मी मानत नाही. आपण सर्व एकच आहोत. मी तुमच्यातीलच मुख्यमंत्री आहे. आमदार आणि खासदार हे लोकांमध्ये जात नाहीत, तोपर्यंत त्यांना नागरिकांचे प्रश्न कळत नाहीत. त्यामुळेच लोकांमध्ये जाऊन काम करतोय, असे सांगत घरात आणि कार्यालयात बसून सरकार चालविता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाडांपुढे मोठे आव्हान
२०१९ मध्ये युतीचेच सरकार येणार होते. परंतु काहींना सत्तेचा आणि खुर्चीचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे ते सरकार येऊ शकले नाही, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. या पक्षप्रवेशादरम्यान शिशिर शिंदे यांनी मी रिक्षाचालक होतो, असा उल्लेख केला होता. तोच धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे यांनी “तुमची रिक्षा मसर्डिजपेक्षा भारी आहे,” असे सांगत उद्धव यांना टोला लगावला. राज्यात आता खऱ्या अर्थाने युतीचे सरकार आले असून लोकहिताची कामे केली जात आहेत. कलाकारांनीदेखील कलाकारांसाठी कामे केली पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नका, अशी सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित मराठी कलावंतांना केली.
हेही वाचा – पलावामध्ये वाहन उभे करण्यावरून वकील आणि त्यांच्या आईला बेदम मारहाण
कलावंतांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण एकत्र काम करुया, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. पायाभूत सुविधांमध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. शासन आपल्या दारी हा उपक्रमही लोकप्रिय होत आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.