ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये सध्या रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू असून रस्त्यावरील अतिक्रमणांवर त्या निमित्ताने हातोडा उगारला जात आहे. शहरातील नागरिक या मोहिमेचे स्वागत करत आहेत. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असून हे पदपथ कायमस्वरूपी मोकळे राहावेत, यासाठी प्रशासनाने कायम प्रयत्नशील राहावे, असे विचार ‘लोकसत्ता ठाणे’च्या वाचकांनी व्यक्त केले आहेत.
निर्णय योग्य!
ठाणे हे शहर गेल्या काही वर्षांमध्ये झपाटय़ाने वाढत आहे. वाढत्या शहराच्या गरजाही तेवढय़ाच झपाटय़ाने वाढत आहेत. निमुळत्या रस्त्यामुळे सतत ठाणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. नव्या आयुक्तांनी रस्ता रुंदीकरणासाठी उचलेले हे पाऊल खरेच स्वागतार्ह आहे. अशा प्रकारच्या कारवाया जर आधीच झाल्या असत्या तर कोंडीच्या समस्येतून ठाणेकरांची केव्हाच मुक्ती झाली असती.
– प्रियांका निंबाळकर, ठाणे
वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल..
रस्ते रुंदीकरणामुळे ठाणे अधिक सुंदर होईल. घोडबंदर, मानपाडा येथे मानवी वस्ती वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने वाहनांचा खोळंबा कमी होण्याची अपेक्षा ठाणेकरांना आहे. चार पदरी रस्त्यांमुळे अपेक्षित ठिकाणी वेळेवर पोहोचणे सोपे जाईल. – सुप्रीम पाठारे, ठाणे
रस्तारुंदीकरण गरजेचे
ठाणे शहरात रस्ते रुंदीकरणाची आवश्यकता आहे. त्यामुळे वाहन कोंडी कमी होईल. ठाणे जिल्हा हा रायगड आणि मुंबईला जोडणारा दुवा आहे. त्यामुळे येथील रस्ता रुंदीकरण करणे ही काळाची गरज आहे. काही दुकाने रस्त्यावर असल्याने नागरिक आपल्या गाडय़ा तेथेच उभ्या करतात आणि खरेदीला जातात. या रस्ता रुंदीकरणामुळे हा प्रकार कमी होईल. – सुवर्णा सोमण, ठाणे
शहरांचा चेहरामोहरा बदलत आहे..
ठाणे शहराबरोबरच कल्याण डोंबिवलीतही रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरु आहे, हे कार्य खरेच उल्लेखनीय आहे. आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे पाडून रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होईल शिवाय नागरिकांनाही प्रवास करणे सुखाचे होईल. दुकानदारांनी किंवा फेरिवाल्यांनी रस्त्यावर वाट्टेल ती जागा बळकाविल्याने शहराचा चेहरामोहरा बदलला आहे, परंतू या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे गर्दी कमी होईल व सुटसुटीत असे छान शहर पहायला मिळेल.
– धनश्री फापाळे, डोंबिवली
प्रवास सुखकर
रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय स्तुत्य आहे. वर्तकनगर परिसरात होत असलेल्या रस्ता रुंदीकरणाची गरज अनेक वर्षांपासून होती. चार रस्ते या ठिकाणी एकत्र जोडले जात असल्याने संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. वाहने दुरुस्ती करणाऱ्या दुकानांबाहेर वाहने उभी केली जात होती. यामुळे रस्ता मुळात मोठा असूनही अरुंद होता. उपवन, शिवाईनगर या ठिकाणची वाढती लोकसंख्या पाहिली तर एकाच वेळी वाहने या ठिकाणी एकत्र आल्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. – प्रशांत वेदक, ठाणे
शहरातील फुटपाथही मोकळे होण्याची गरज
कल्याण शहरातील रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांना रुंद रस्ते उपलब्ध होत आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्टी असली तरी ही सुधारणा कायमस्वरूपी राहणे हेदेखील महत्त्वाचे आहे. अन्यथा हे आयुक्त गेल्यानंतर पुन्हा अतिक्रमणे कायम अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको. रस्त्यांबरोबरच फुटपाथही मोकळे करण्याची गरज आहे. फुटपाथ उपलब्ध झाल्यास नागरिकांना सुरक्षितपणे रस्त्याने चालणे शक्य होऊ शकले.
– प्रवीण देशमुख, कल्याण