कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम, प्रभागांमधील पाणी पुरवठा वितरण वाहिन्यांमधील गळती दुरुस्तीची कामे गुरुवारी (ता.२) सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत पालिका प्रशासनाकडून केली जाणार आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा-मांडा शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण, डोंबिवली शहरांना उल्हास नदीतून पाणी पुरवठा केला जातो. या नदीतून उचललेले अशुध्द पाणी कल्याणमधील बारावे, मोहिली, डोंबिवली जवळील नेतिवली, टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते. तेथे या पाण्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करून मग हे पाणी नागरी वस्तीत पिण्यासाठी सोडले जाते. कल्याण, डोंबिवली शहर परिसराला दररोज सुमारे ३४० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा पालिकेकडून केला जातो.
हे ही वाचा… ३१ डिसेंबरच्या रात्री ३११ मद्यपी चालकांविरोधात कारवाई
पालिका हद्दीतील विविध भागातील जलवाहिन्या रस्ते कामे आणि इतर कारणांमुळे काही ठिकाणी फुटल्या आहेत. या जलवाहिन्यांमधून रस्त्यावरून पाणी वाहत असते. या जलवाहिन्या दुरुस्तीची कामे पाणी पुरवठा बंद केल्याशिवाय कामगारांना करता येत नाहीत. गळक्या जलवाहिन्या दुरुस्तीची कामे या पाणी पुरवठा बंदच्या काळात केली जाणार आहेत, असे पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले.
हे ही वाचा… डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांसाठी १५० मीटरची सीमारेषा
या अठरा तासाच्या पाणी पुरवठा बंदच्या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, मांडा, टिटवाळा, शहाड, आंबिवली, वडवली, अटाळी आणि कल्याण ग्रामीणमधील काही गावांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या पाणी पुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.