ठाणे : महिला दिनानिमित्त ठाण्यातील आजी आईंच्या शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ओवी, भजन, नृत्य, चित्रकला, मनोगत असे विविध कार्यक्रम असणार आहेत. या उपक्रमात ३५ आजी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी आजींची मागील १५ दिवसांपासून तयारी सुरू आहे.
ठाण्यातील के.व्ही. सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि जयश्री फाउंडेशन यांच्यावतीने मागील दोन वर्षांपासून आजी आईंची शाळा सुरू करण्यात आली आहे. ही शाळा वागळे इस्टेट परिसरातील शांतीनगर भागात असलेल्या एका खोलीत भरत आहे. या शाळेत ५० ते ८० वयोगटातील एकूण ४० आजी शिक्षण घेत आहेत. आठवड्याच्या मंगळवार आणि शनिवार सायंकाळी ४ ते ६ यावेळेत या शाळेचे वर्ग भरतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच आजी आईंना निळ्या रंगाचा गणवेश देण्यात आला आहे. या माध्यमातुन पन्नास वर्षापुढील महिलांना पुन्हा एकदा नव्याने बालपण जगण्याची संधी शाळेने दिली आहे. आजींना लिहीता वाचता यावे,या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.
यंदा आजी आईंच्या शाळेत पहिल्यांदाच महिला दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आजी देखील पहिल्यांदाच महिला दिन साजरा करण्याचा अनुभव घेणार आहे. महिला दिनानिमित्त आजींना विविध उपक्रम देण्यात आले आहेत. उपक्रमात आजी ओव्या, भजन, चित्रकला त्याचबरोबर समूह नृत्य आणि एकल नृत्य देखील करणार आहेत. आजी समूह नृत्य आणि एकल नृत्य करणार असल्याने आजींची मागील पंधरा दिवसांपासून तयारी सुरू आहे.
आजींना शिक्षणाबरोबरच त्यांच्या वयानुसार असलेल्या आवडी निवडी या शाळेत जपल्या जात आहेत. मागील काही महिन्यापासून आजींना भजनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात भजनी मंडळ स्थापन करण्याचा विचार आहे. या प्रशिक्षणातील काही गोष्टी प्रथमच महिला दिनानिमित्त सादर करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी आजी देखील उत्साहात असल्याचे पहायला मिळत आहे. आजी आईंच्या शाळेत मंगळवारी ११ मार्चला महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये आजी विविध रंगांतील पेहराव परिधान करणार आहेत. तसेच त्यांनी गेल्या दोन वर्षांत शिकलेल्या गोष्टींविषयी अनुभव सांगणार आहेत. या उपक्रमामुळे आजी आईंना नव्या उमेदीने जीवन जगण्याची संधी मिळत असल्याची भावना आयोजक माधुरी पाटील यांनी व्यक्त केली.