कल्याण- डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष; आगीसारख्या दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती
कल्याणमधील रेल्वे स्थानकालगतचे स्कायवॉकचे कोपरे पुन्हा कचऱ्याने भरून गेले आहेत. स्कायवॉकचे कोपरे कचऱ्याने भरले की, त्याचे वजन पादचाऱ्यांच्या पायाखालील पट्टय़ांवर (शीट) पडते. हळूहळू पट्टय़ा कचऱ्याच्या वजनाने दबत जाऊन रस्त्यावर पडतात. त्यामधून एखादी अपघाताची दुर्घटना घडते. काही वेळा एखादा गर्दुल्ला किंवा पादचारी पेटलेली सिगारेट स्कायवॉकच्या फडताळात फेकतो. तेथील कचरा पेट घेतो. अशा दुर्घटना गेल्या सहा महिन्यांत स्कायवॉकवर घडल्या आहेत.
स्कायवॉकच्या पट्टय़ा रस्त्यावर अचानक कोसळणे, स्कायवॉकला आग लागणे हे प्रकार वारंवार कल्याण पश्चिमेतील स्कायवॉकबाबत घडत आहेत. या आगीमागचे मुख्य कारण या स्कायवॉकवर बसणारे फेरीवाले, गर्दुल्ले हेच आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांत दोन ते तीन वेळा स्कायवॉकच्या पायाखालच्या पट्टय़ा कोसळणे, आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
स्कायवॉकच्या कोपऱ्याला फेरीवाले, गर्दुल्ले, पादचाऱ्यांकडून कागद, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, फाटलेले कपडे, टाकाऊ माल, नाशिवंत सामान टाकले जाते. या कचऱ्यावर पाणी पडले, पाऊस पडला की त्याचे वजन वाढते. हळूहळू फायबरसारख्या असणाऱ्या स्कायवॉकच्या पट्टय़ा कचऱ्याच्या वजनाने वाकत जाऊन कोसळतात. असे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने आणि ठेकेदाराने सांगितले.
दुर्घटना घडल्यानंतर पालिकेकडून खास पथक तयार करून स्कायवॉकच्या कोपरे, फडताळांमध्ये साचलेला कचरा काढण्याचे काम केले जाते. त्यानंतर पुन्हा या कामाकडे पालिका दुर्लक्ष करते. गेल्या काही दिवसांपासून स्कायवॉकचे कोपरे पुन्हा कचऱ्याने भरून गेले आहेत. या कचऱ्याकडे पालिकेचे लक्ष नाही. पालिकेची फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असूनही फेरीवाले स्कायवॉकवर येऊन बसत आहेत. त्यामुळे अधिक मोठय़ा प्रमाणावर कचरा तयार होऊ लागला आहे. हा कचरा स्कायवॉकच्या कोपऱ्यांमध्ये टाकला जात आहे. पालिकेचे साहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
फेरीवाले स्कायवॉकवर..
अलीकडे कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवर बसणारे फेरीवाले स्कायवॉकवर येऊन व्यवसाय करीत आहेत. येण्या-जाण्याच्या मार्गात हे फेरीवाले बसत असल्याने पादचाऱ्यांना या भागातून येजा करणे शक्य होत नाही. एखादी आग, पट्टय़ा कोसळण्याची दुर्घटना घडल्यास या संकटाला एक दिवस पालिकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा