डोंबिवली परिसरात महावितरणने मंगळवारपासून विभागवार दीड तासांचे वीज भारनियमन सुरू केले आहे. भर पावसाळ्यात असह्य़ उकाडा होत आहे. त्यात भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डोंबिवलीतील रामनगर, गणेश मंदिर, नालंदा, दत्तनगर, नवापाडा, टिळकनगर, कोपररोड, शास्त्रीनगर, आगरकर रस्ता या भागातील महावितरणच्या फिडरप्रमाणे हे भारनियमन करण्यात येत आहे. सकाळी सहा ते सकाळी साडेसात या वेळेत दीड तासाचे भारनियमन करण्यात येते. या वेळेत घरातील मुले शाळेत जातात. पाणी तापवण्यासाठी हीटर गरजेचे असते. वीज नसल्याने ते बंद राहते. त्यामुळे गॅसवर पाणी गरम करावे लागते, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.
सकाळी ६ ते सकाळी ७.३०, दुपारी १ ते दुपारी १.४५ मिनिटे, संध्याकाळी ६ ते संध्या. ७.३० अशा भारनियमनाच्या वेळा आहेत. नागरिक, व्यापारी यांच्या सोयीच्या वेळा पाहून भारनियमन करण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader