ठाणे : Ganeshostav in thane गणेशोत्सवानिमित्ताने ठाणे जिल्ह्यात उद्या सुमारे दीड लाख गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये १ लाख ४८ हजार ७५४ खासगी आणि एक हजार ५४ सार्वजनिक गणेशमूर्तींचा सामावेश असणार आहे. मिरवणूकीत गालबोट लागू नये म्हणून ठाणे शहरात सुमारे चार हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. ठाणे जिल्ह्यात दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी जिल्ह्यातील ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर शहर आणि भिवंडी शहरात १ लाख ४९ हजार ८०८ गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
यामध्ये १ हजार ५४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुर्तींचा सामावेश असून ठाणे शहरात ३४०, भिवंडी शहरात १५३, डोंबिवली-कल्याण २९४, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर २६७ सार्वजनिक गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, खासगी गणेशमुर्तींचे प्रमाणदेखील यावर्षी मोठ्याप्रमाणात आहे. आयुक्तालय क्षेत्रात १ लाख ४८ हजार ७५४ खासगी गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. ठाणे शहरात ४१ हजार ७५६, भिवंडीत १३ हजार ४१७, डोंबिवली कल्याणमध्ये ४८ हजार २३०, उल्हासनगर ते बदलापूरमध्ये ४५ हजार ३५१ गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.