ठाण्यातील महिला गटाच्या प्रयत्नांतून दीड हजार किलो धान्याचे वाटप
एकीकडे भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुसरीकडे अवर्षणामुळे जाणवत असलेला अन्नधान्याचा तुटवडा यामुळे ग्रामीण भागातील विशेषत: गरीब वर्गातील जनतेचे जिणे कठीण बनले आहे. अशा वेळी मोठमोठय़ा सामाजिक संस्था नेहमीच पुढे येत असताना ठाण्यातील ‘वुई टुगेदर’ या महिला गटाने धान्यपेढी स्थापन करत गरजूंच्या पोटाला अन्न पुरवण्याचा संकल्प सोडला आहे. या महिलांनी एकत्र केलेले दीड हजार किलोचे धान्य कामगारांच्या मुलांसाठी काम करणारी बीड जिल्ह्य़ातील शांतिवन आणि कर्जतजवळील रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या श्रद्धा फाऊंडेशन या दोन संस्थांना येत्या रविवारी ३ एप्रिल रोजी दिले जाणार आहे.
आपण समाजासाठी काहीतरी करावे या उद्देशाने ठाण्यातील दहा गृहिणींनी एकत्र येऊन ‘वुई टुगेदर’ हा गट स्थापन केला. या समूहात आता अन्य महिलाही सहभागी होत आहेत. या गटामार्फत ‘ग्रेन बँक’ म्हणजेच धान्य पेढी सुरू करण्यात आली. घोडबंदर रोडवरील रुणवाल इस्टेट येथे राहणाऱ्या उज्ज्वला बागवाडे या गृहिणीने या उपक्रमाची कल्पना मांडली. त्याला इतर महिलांनीही साथ दिली. मीनाक्षी कुंदर, योगिता कुलकर्णी, स्वाती प्रभुणे, जाई जोशी, श्रुती देशपांडे, स्नेहला नाकाडे आदी गृहिणी या धान्यपेढीचे काम पाहतात. धान्यपेढी या उपक्रमासाठी परिचितांकडून दर महिना फक्त एक किलो धान्य गोळा केले. अवघ्या दीड महिन्यातच त्यांनी दीड हजार किलो धान्य संकलित केले आहे.
सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न फारच गंभीर होत चालला आहे. शेतीसाठी पाणी नाही, अशा दुष्काळग्रस्त भागामध्ये ‘अक्षयचुल’ नावाने अन्नछत्र सुरू करण्याची आमची योजना आहे. त्याद्वारे किमान दोनवेळची भाकरी परिसरातील दुष्काळग्रस्तांना देणे शक्य होईल.
-उज्ज्वला बागवाडे, ठाणे</strong>