लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर वाहनांच्या दोन्ही बाजुने दीड ते दोन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. सुट्टीचा दिवस आहे. नागरिक अधिक संख्येने बाहेर पडले आहेत, हे माहिती असुनही पडघा टोल नाक्यावरील कर्मचारी टोल घेण्याचे काम संथगतीने करत असल्याचे रविवारी रात्री कल्याण लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या निदर्शनास आले. याच रस्त्याने जात असलेल्या खासदारांना टोल नाक्यावरील कोंडीचा फटका बसला. यामुळे संतप्त झालेल्या खासदार म्हात्रे यांनी वाहनातून उतरून पडघा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना जलदगतीने काम करण्यास सांगून वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी खडसावले.

पडघा टोल नाक्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत हे माहिती असुनही आपण संथगतीने काम करताच कसे. ही वाहने पटापट सोडण्याचे आपले काम नाही का, असे प्रश्न खासदार बाळ्या म्हात्रे यांनी टोल कर्मचाऱ्यांना केले. सुट्टीनिमित्त नागरिक अधिक संख्येने घराबाहेर पडले आहेत. काहींना पर्यटनस्थळी जायचे असेल. असे लोक तेथे पोहचणार कधी, असा सवाल खासदारांनी केला.

आणखी वाचा-सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रविवारी रात्री खासदार बाळ्या मामा म्हात्रे मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाका येथून जात होते. त्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजुला टोल वसुलीमुळे दीड किलोमीटरच्या रांगा लागल्याचे दिसले. त्यांचेही वाहन या टोल नाक्यावरील कोंडीत अडकले. टोलनाक्यावरील कर्मचारी टोल वसुलीचे काम अतिशय संथगतीने करत असल्याचे निदर्शनास आल्यावर खासदार बाळ्या मामा म्हात्रे त्यांच्या वाहनातून खाली उतरले. त्यांनी टोल वसुली चौकीतील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तुम्ही लोक अतिशय संथगतीने काम करता म्हणून टोल नाक्याच्या दोन्ही बाजुला रांगा लागल्या आहेत. हे तुम्हाला दिसत नाही का. टोल वसुली करून तुम्ही लोकांना उगाच कोंडीमध्ये अडकवता, अशा शब्दात खासदारांनी टोल कर्मचाऱ्यांना खडसावले.

आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्गावर कारला आग, महामार्गावर वाहतुक कोंडी

खासदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे टोल नाक्यावरील रांगेत अडकलेल्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. खासदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मात्र टोल कर्मचारी सतर्क झाले. त्यांनी टोल शुल्क वसुली सयंत्रावरील हात गतीने चालवून टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले.

‘नववर्षानिमित्त अधिक संख्येने नागरिक पर्यटनासाठी बाहेर चालले आहेत. काही बाहेरगावाहून येत आहेत. रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. त्याचा भार टोल नाक्यावर येत आहे. टोल नाक्यावरील टोल शुल्क पावती देणारे सयंत्र काम करते त्याप्रमाणे आम्ही काम करतो. याठिकाणी संथगतीने काम करण्याचा प्रश्न नाही,’ असे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader